स्नेहयात्री करंडकमध्ये पहिल्या दिवशी चार एकांकिकेंचे सादरीकरण : रेल प्रबंधक पुनीत अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटन :

. भुसावळ ( प्रतिनिधी )

येथील स्नेहयात्री प्रतिष्ठानद्वारे आयोजित राज्यस्तरीय स्पर्धा स्नेहयात्री करंडकाच्या पहिल्या दिवशी एकूण चार एकांकिकेंचे सादरीकरण करण्यात आले.

स्पर्धेच्या सभागृहाला स्व. राजकुमारी मनोहर जाधवानी आणि रंगमचाला स्व. डॉ. उमेश खानापूरकर रंगमंच असे नाव देण्यात आले आहे. ह्या राज्यस्तरीय स्पर्धेचे उद्घाटन भुसावळ मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाचे मंडळ रेल प्रबंधक पुनीत अग्रवाल यांच्या हस्ते झाले. मंचावर भगवती असोसिएट्स चे मनोहर जाधवानी, स्नेहयात्रीचे विरेंद्र पाटील, मुकेश खपली, नारायण माळी, समीर पाटील, आशिष जाधवानी यांची प्रमुख उपस्थिती होती.

आपल्या अध्यक्षीय भाषणात डी. आर. एम. पुनीत अग्रवाल यांनी नाटकाच्या माध्यमातून सामाजिक, आध्यात्मिक आणि

सांस्कृतिक मूल्य संवर्धन होऊ शकते असे सांगितले. पहिल्या दिवशी सादर झालेल्या वैभवदीप नाट्यसंस्थेच्या प्रेम की यातना ह्या एकांकिकेत प्रेमाचा ओलावा आणि गैर समजुतीतून निर्माण होणारा मनातील दुरावा आणि त्यातून निर्माण होणारी गुंतागुत ह्यांचे यथार्थ सादरीकरण केले गेले. नाट्यरंग जळगांव ह्या संस्थेच्या गाईड ही एकांकिका श्रद्धा, अंधश्रधा, महाराष्ट्राची वारकरी परंपरा व विज्ञान ह्या विषयांना स्पर्श करून गेली.

पुणे येथील इन्फिनिटी स्टुडिओची पुंडलिक वरदा ही एकांकिका वडिलोपार्जित धनसंपदेच्या वाटणी दरम्यान निर्माण होणाऱ्या गुंतागुंतीतून म ाणसांच्या स्वभावाचे रंग दाखवत अनेक प्रश्न उभे करून गेली.

व्हाईट एलिफंट डोंबिवली ह्या संस्थेने सादर केलेल्या ट्युलिप ह्या एकांकिकेत मानवी जीवन, जीवनातील नातेसंबंधांची गुंतागुंत, तंत्रज्ञान निसर्ग आणि मानवाच्या परस्परसंवादाच्या माध्यमातून मानवी मनोव्यापार ह्यावर यथार्थ मार्मिक भाष्य केले गेले.