भुसावळ (प्रतिनिधी ) – :
गेल्या काही वर्षांपासून ग्रामीण भागात स्वयंपाकासाठी गॅसचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला होता. केंद्र शासनाच्या योजनांमुळे घराघरांत गॅस शेगडी व सिलेंडर पोहोचले होते. मात्र सध्या निर्माण झालेल्या आखाती युद्धजन्य परिस्थितीमुळे गॅस सिलेंडरच्या पुरवठ्यात मोठी घट झाली असून, याचा थेट परिणाम शहरासह ग्रामीण जीवनावर होताना दिसत आहे.

गॅस सिलेंडर वेळेवर उपलब्ध होत नसल्याने अनेक कुटुंबांनी पुन्हा पारंपरिक चुलीचा आधार घेतला आहे. गॅसची बचत करण्यासाठी महिलावर्गाने चूल पेटवून स्वयंपाक करण्यास सुरुवात केली आहे. कपाशीच्या व तुरीच्या काड्या तसेच कोरडे लाकूड यांचा इंधन म्हणून मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे.
काही वर्षांपूर्वीपर्यंत चुलीचा वापर कमी झाला होता; त्यामुळे आता पुन्हा त्या पद्धतीशी जुळवून घेताना काही अडचणी जाणवत आहेत. तरीही गॅस मिळण्यासाठी लागणारी प्रतीक्षा टाळण्यासाठी महिलांनी हा पर्याय स्वीकारला आहे. शहरांमध्ये गॅस टंचाईबाबत तक्रारी होत असल्या तरी ग्रामीण भागातही परिस्थिती तितकीच गंभीर आहे, मात्र याबाबत मोठ्या प्रमाणात आवाज उठताना दिसत नाही.
दरम्यान, लग्नसमारंभ, धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांमध्येही पारंपरिक पद्धतीने जमिनीत चर खोदून चुलीवर स्वयंपाक करण्याची पद्धत पुन्हा रूढ होत आहे. या पद्धतीत तयार होणाऱ्या जेवणाची चव अधिक रुचकर असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.
तथापि, चुलीचा वाढता वापर पर्यावरणाच्या दृष्टीने चिंताजनक ठरू शकतो. सरपणासाठी जंगलातून लाकूड आणण्याचे प्रमाण वाढल्यास वृक्षतोडीचा धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
ग्रामीण भागात गॅस सिलेंडरचा सुरळीत व नियमित पुरवठा लवकरात लवकर सुरू व्हावा, अशी अपेक्षा महिलावर्गाकडून व्यक्त केली जात आहे.


