भुसावळात गुढीपाडवा निमित्त पारंपरिक वेशात ‘लेडीज इक्वलिटी रन’; मानसिक आरोग्यावर डॉ. केतकी पाटील यांचे मार्गदर्शन

भुसावळ (प्रतिनिधी) – गुढीपाडवा निमित्त स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनतर्फे आयोजित बिसारा लेडीज इक्वलिटी रनच्या आठव्या प्रशिक्षण सत्रात महिला धावपटूंनी पारंपरिक वेशभूषेत उत्साहात सहभाग नोंदवला. गुरुवार, 19 मार्च रोजी कृष्णचंद्र सभागृह परिसरात हा उपक्रम संपन्न झाला.
पहाटे सहा वाजण्यापूर्वीच साडी, नऊवारी पातळ अशा पारंपरिक वेशात महिला धावपटू मैदानावर दाखल झाल्या. वातावरणात उत्साहाचे व आनंदाचे वातावरण होते. सुरुवातीला वार्मअप व्यायाम घेण्यात आला, त्यानंतर चार किलोमीटरच्या धावण्याला प्रारंभ झाला. पारंपरिक वेशभूषेमुळे सुरुवातीला अडचणी जाणवल्या, मात्र सर्व महिलांनी आनंदाने धाव पूर्ण केली. धावतानाच सेल्फी, ग्रुप फोटो व शूटिंग करत सहभागी महिलांनी उपक्रमाची रंगत वाढवली. दरम्यान, वाहतूक व्यवस्थेचे योग्य नियमन करण्यात आले.
धावण्यानंतर स्ट्रेचिंग सत्र पार पडले आणि त्यानंतर गुढीपाडवा निमित्त विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमासाठी गोदावरी फाउंडेशनच्या संचालिका डॉ. केतकी पाटील प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. त्यांचे स्वागत डॉ. निलिमा नेहेते, डॉ. चारुलता पाटील आणि स्वाती फालक यांनी पुष्पगुच्छ व शाल देऊन केले.
यावेळी बोलताना डॉ. पाटील यांनी मानसिक आरोग्याचे महत्त्व अधोरेखित केले. “मानसिक आरोग्य हे केवळ महिलांसाठीच नव्हे, तर कुटुंबातील पुरुषांसाठीही तितकेच आवश्यक आहे. चांगले मानसिक स्वास्थ्य कुटुंब व कार्यक्षेत्रात सकारात्मक परिणाम घडवते,” असे त्यांनी सांगितले. तसेच आधुनिक युगात विज्ञानाबरोबर अध्यात्माची जोड आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रविण पाटील यांनी केले, तर अध्यक्षस्थानी प्रा. प्रविण फालक होते. या रनचे नेतृत्व गारगी भोळे व अवनी चंदन या बालिकांनी केले. त्यांच्या मागे महिला आणि त्यानंतर पुरुष धावपटू असा क्रम ठेवण्यात आला होता.
या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुयश न्याती, संजय तिवारी, प्रविण वारके आणि प्रशांत वंजारी यांनी सहकार्य केले.


