नाशिकमध्ये ‘भविष्यवेत्ता’ अटकेत; 58 आक्षेपार्ह व्हिडिओंचा धक्कादायक उलगडा

नाशिक – स्वतःला ‘कॉस्मोलॉजी तज्ज्ञ’ आणि भविष्य सांगणारा म्हणून प्रसिद्ध असलेला अशोक खरात उर्फ ‘स्वघोषित कॅप्टन’ याला बलात्कार प्रकरणात पोलिसांनी अटक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

सरकारवाडा पोलीस ठाण्यात 35 वर्षीय महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपीने भविष्य सांगण्याच्या बहाण्याने आणि भीती दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. तक्रार दाखल होताच पोलिसांनी तत्काळ कारवाई करून त्याला अटक केली.

तपासादरम्यान आरोपीच्या कॅनडा कॉर्नर परिसरातील कार्यालयातून मोठे पुरावे जप्त करण्यात आले. ‘ओकस प्रॉपर्टी डीलर अँड डेव्हलपर्स’ या नावाने चालणाऱ्या कार्यालयात गुप्त सीसीटीव्ही कॅमेरे बसवले होते.

पोलिसांना एका पेनड्राईव्हमध्ये तब्बल 58 आक्षेपार्ह व्हिडिओ सापडले असून, त्यामध्ये अनेक महिलांचे चित्रीकरण असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महिलांना भविष्याची भीती दाखवून किंवा आमिष देऊन जाळ्यात ओढले जात असल्याचा संशय आहे.

या प्रकरणात ‘हनीट्रॅप’चा कोनही तपासात समोर येत असून, आरोपी महिलांना फसवून त्यांचे गुप्त चित्रीकरण करत असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

या प्रकरणाचे धागेदोरे केवळ नाशिकपुरते मर्यादित नसून, इतर शहरांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. जप्त व्हिडिओंमधील व्यक्तींची ओळख पटवण्यासाठी पोलीस आणि क्राईम ब्रँच सखोल तपास करत आहेत. यामध्ये काही बड्या व्यक्तींची नावे समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

या घटनेनंतर समाजात संतापाची लाट उसळली असून, अंधश्रद्धेच्या नावाखाली महिलांचे शोषण झाल्याचा गंभीर आरोप केला जात आहे. पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, अशा व्यक्तींपासून सावध राहावे आणि संशयास्पद प्रकार त्वरित कळवावे

पुढील तपासात आणखी कोणते धक्कादायक खुलासे होतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.