​संघटनेच्या माध्यमातूनच कर्मचाऱ्यांचे प्रश्न सुटतात: राज्याध्यक्ष अशोक डहाळे

​जळगाव (प्रतिनिधी ) -“प्रशासनात कर्मचारी हा अत्यंत महत्त्वाचा दुवा आहे. कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी संघटनात्मक एकता आणि प्रभावी नेतृत्व आवश्यक असते. जळगाव जिल्हा याकामी नेहमीच अग्रेसर राहिला आहे,” असे प्रतिपादन ‘जय महाराष्ट्र शासकीय-निमशासकीय अधिकारी-कर्मचारी संघटने’चे राज्याध्यक्ष अशोक डहाळे यांनी केले.

​अजिंठा विश्रामगृह येथे आयोजित संघटनेच्या विशेष बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांच्या नुकत्याच झालेल्या आंदोलनावर आणि संघटनात्मक बांधणीवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

​एकजुटीमुळेच आंदोलन यशस्वी: आर. टी. सोनवणे
याप्रसंगी बोलताना पालक अध्यक्ष आर. टी. सोनवणे म्हणाले की, “गेल्या काही दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेच्या लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनामुळे कर्मचाऱ्यांच्या समस्या शासन स्तरावर मांडल्या गेल्या. जळगाव जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या अभूतपूर्व एकजुटीमुळेच हे आंदोलन यशस्वी होऊ शकले, ही संघटनेसाठी अभिमानास्पद बाब आहे.”

​विविध विभागांच्या कर्मचाऱ्यांची उपस्थिती
बैठकीत कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी अधिक प्रयत्नशील राहण्याबाबत चर्चा झाली. या चर्चेत विनायक बैसाने, जयवंत वानखेडे, नितीन शिंपी, नितीन पाटील, प्रमोद काळे, पुरुषोत्तम पाटील, पंकज पाचपोळ, किरण लाडवंजारी, गणेश पाटील, नयन गोहिल, सचिन विसपुते, संजय कोळी, अनिल चौधरी, जयवंत सावंते, विवेक अत्तरदे, महेंद्रसिंग पाटील आणि सुधीर अत्रे यांनी सहभाग नोंदवला. बैठकीला मेडिकल कॉलेज, पाटबंधारे विभाग, जिल्हा परिषद आणि लिपिक वर्गीय कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.