साकेगावात हिंदू युवकांकडून इफ्तार पार्टी; एकात्मतेचे सुंदर दर्शन

भुसावळ (प्रतिनिधी ) : शहरालगतच्या साकेगाव येथे हिंदू युवकांनी सामाजिक एकात्मतेचा संदेश देत मुस्लिम बांधवांसाठी पवित्र रमजान महिन्यानिमित्त इफ्तार पार्टीचे आयोजन केले. मॉर्निंग सीसी ग्रुपतर्फे डॉ. कैलास ठाकरे, अजय चौधरी आणि राहुल चौधरी यांनी या उपक्रमासाठी पुढाकार घेतला होता.

साकेगाव गावात विविध ३२ जाती-धर्मांचे लोक गुण्यागोविंदाने राहत असून गावात नेहमीच सामाजिक सौहार्दाचे वातावरण पाहायला मिळते. हिंदू समाजाच्या दिंडीचे मुस्लिम बांधव स्वागत करतात, तर मुस्लिम समाजाच्या विविध कार्यक्रमांमध्ये हिंदू बांधवही उत्साहाने सहभागी होतात. अशा पार्श्वभूमीवर हिंदू युवकांनी रमजान निमित्त आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीतून पुन्हा एकदा गावातील एकात्मतेचे सुंदर उदाहरण समोर आले.

बालूमिया परिसरात आयोजित करण्यात आलेल्या या इफ्तार कार्यक्रमाला मुस्लिम बांधवांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. गावात सौहार्द आणि एकात्मता कायम राहावी, आपसातील भाईचारा वाढावा तसेच माणुसकीच्या नात्याने प्रत्येकाने एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी व्हावे हा या उपक्रमामागील उद्देश असल्याचे डॉ. कैलास ठाकरे यांनी सांगितले.

हिंदू युवकांनी इफ्तार पार्टीचे आयोजन केल्याबद्दल मुस्लिम बांधवांनी आनंद व्यक्त केला. सध्याच्या काळात अशा प्रकारचे सौहार्द वाढवणारे कार्यक्रम समाजासाठी अत्यंत आवश्यक असल्याचेही यावेळी उपस्थितांनी नमूद केले.

या प्रसंगी मौलाना फिरोज उमरी, जगदीश वळवी, रमजान पटेल, पियुष पाटील, जाकीर पटेल, वासेफ पटेल, अलाउद्दीन शेख, अन्सार पटेल, रियाज पटेल, मोसिन पटेल, मजीद शेख, दानिश शेख, पप्पू पटेल, आसिफ पटेल यांच्यासह गावातील अनेक समाजबांधव, युवक व लहान मुलांनी सहभाग नोंदविला.