भुसावळ (प्रतिनिधी) – श्री अक्कलकोट स्वामी महाराज प्रकट दिनानिमित्त तेजोदीप नवविचार फाऊंडेशनतर्फे अनंतकोटी या नाट्यप्रयोगाचे आयोजन शुक्रवार, २० मार्च २०२६ रोजी करण्यात आले आहे. यावल रोडवरील साईजीवन शॉपीमागील सप्तशृंगी माता मंदिर रंगमंच, के. नारखेडे शाळेजवळ, तापीनगर येथे हा नाट्यप्रयोग प्रथमच सादर होणार आहे.

जळगाव जिल्ह्यातील ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या दुर्बल होतकरू विद्यार्थ्यांना नाशिक येथे शिक्षणासाठी आल्यानंतर राहण्याची मोठी अडचण भासते. ही समस्या लक्षात घेऊन फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष राजेश नेहेते व कार्यकारिणी सदस्यांनी दोन वर्षांपूर्वी देणगीदारांच्या लोकवर्गणीसह कर्ज काढून त्र्यंबकेश्वर रोडवरील बेळगाव ढगा परिसरात सुमारे ३ हजार चौ. फूट जागा फाऊंडेशनच्या नावे खरेदी केली आहे. या ठिकाणी भविष्यात भव्य वसतिगृह उभारण्याचा मानस असून, त्यासाठी निधी संकलनाचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून भुसावळ येथे या नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे.
अनंतकोटी हे नाटक स्वामी चरित्रावर आधारित दर्जेदार नाट्याविष्कार असून महाराष्ट्रासह कर्नाटक व गोवा राज्यांमध्येही या नाटकाला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. या नाट्यप्रयोगात १५ पेक्षा अधिक कलाकारांचा सहभाग असून, श्री स्वामी समर्थ यांच्या भूमिकेत दशरथ निकम रसिकांना मंत्रमुग्ध करतात. हे नाटक राजन शंकर कोठारकर लिखित व दिग्दर्शित असून संगीत साथ मधु रेडकर यांनी दिली आहे.
या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी फाऊंडेशनचे पदाधिकारी व सदस्य मुरलीधर खर्चे, अरुण धांडे, पंकज नाले, नाना पाटील, धर्मराज देवकर, निलेश वाणी, किरण पाटील, विनायक बेंडाळे, बाळू भोगे, मुकंदा रोटे, किरण के. पाटील, शिशिर भंगाळे, संध्या वराडे, मनिषा महाजन, सीमा पाटील यांच्यासह जळगाव जिल्ह्यातील स्वामी भक्त आणि सर्व सहयोगी सदस्य कार्यरत आहेत. संस्थापक अध्यक्ष राजेश नेहेते व प्रभारी अध्यक्ष संदीप राणे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित केला जात आहे.
या नाट्यप्रयोगासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून तिकीट खरेदीद्वारे फाऊंडेशनच्या उपक्रमाला सहकार्य करावे, असे आवाहन तेजोदीप नवविचार फाऊंडेशनतर्फे करण्यात आले आहे.


