निपुण महाराष्ट्र उपक्रमांतर्गत मातांचा गौरव; काहुरखेडे शाळेत डिजिटल वर्गाची सुरुवात :


ग्रामपंचायतीकडून तीन स्मार्ट टीव्ही भेट; महिला दिन उत्साहात साजरा

काहुरखेडे (प्रतिनिधी) :
जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काहुरखेडे येथे विविध उपक्रमांनी कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान गुणवत्तावाढीसाठी मातांचा महत्त्वपूर्ण सहभाग असल्याने त्यांच्या योगदानाचा गौरव करत शाळेत मातांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी ग्रामपंचायत काहुरखेडे यांच्या वतीने शाळेला भेट देण्यात आलेल्या तीन स्मार्ट टीव्हींच्या माध्यमातून डिजिटल क्लासरूमची सुरुवात करण्यात आली. डिजिटल वर्गाचे उद्घाटन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील व सरपंच गीता पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमादरम्यान शाळा व्यवस्थापन समिती सदस्य ज्योती सपकाळे, मनीषा पाटील, वैशाली पाटील, ललिता झांबरे तसेच सरपंच गीता पाटील या मातांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमात विद्यार्थिनी गायत्री पाटील व श्रद्धा पाटील यांनी महिला दिनानिमित्त प्रभावी भाषणे केली. सावित्रीबाई फुले यांच्या प्रेरणेने आज महिलांनी शिक्षण, विज्ञान, क्रीडा, राजकारण आदी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करत उंच भरारी घेतल्याचे त्यांनी आपल्या मनोगतातून सांगितले.

यावेळी विद्यार्थिनी माता सावित्रीबाई, माता जिजाऊ, भारत माता तसेच संत मुक्ताबाई यांच्या वेशभूषेत सहभागी झाल्या होत्या. विविध पोशाखांमुळे कार्यक्रमात विशेष रंगत निर्माण झाली. महिला दिनानिमित्त विद्यार्थिनींसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षक समाधान जाधव यांनी केले, तर आभार प्रदर्शन शाळेच्या मुख्याध्यापिका उज्वला सुरवाडे यांनी केले. या उपक्रमामुळे महिलांचा सन्मान होत असल्याने उपस्थित महिलांनी आनंद व्यक्त केला. ग्रामस्थ व विद्यार्थ्यांनीही या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले.