महिला दिनानिमित्त समाजसेविका सुनिता महाडिक यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन; तरवाडे जि.प. शाळेत उत्साहात कार्यक्रम

चाळीसगाव (प्रतिनिधी) : जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, तरवाडे येथे सोमवार (दि. ९ मार्च) रोजी प्रेरणादायी व उत्साहपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. समाजसेविका व लाईव्ह नवं विचार न्यूज च्या मुख्य संपादक सौ. सुनिता राजेंद्र महाडिक या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. त्यांच्या मार्गदर्शनामुळे कार्यक्रमाला विशेष प्रेरणादायी स्वरूप प्राप्त झाले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती मनीषा पाटील यांनी पुष्पगुच्छ व शॉल देऊन सुनिता महाडिक यांचे स्वागत केले. स्वागतपर भाषणात त्यांनी सांगितले की, समाजकारण, पत्रकारिता आणि विविध संघटनांमधील जबाबदाऱ्या अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडत सुनिता महाडिक यांनी समाजात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या कार्यातून अनेक महिलांना प्रेरणा मिळत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

सौ. सुनिता महाडिक या पत्रकारितेसोबतच सामाजिक क्षेत्रातही सक्रिय असून समाजातील दुर्लक्षित घटकांचे प्रश्न मांडणे, महिलांचे प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचवणे आणि सामाजिक न्यायासाठी सातत्याने आवाज उठवणे यासाठी त्या ओळखल्या जातात. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना “समाजरत्न” या सन्मानाने गौरविण्यात आले आहे.

सध्या त्या Live नवं विचार Newsच्या मुख्य संपादक म्हणून कार्यरत असून आयडियल पत्रकार संघ ठाणे जिल्हा अध्यक्ष, ठाणे जिल्हा पत्रकार संघ सदस्य, दैनिक अहिल्याराज पत्रकार, व्हॉईस ऑफ मीडिया जळगाव जिल्हा सचिव, हिंदी मराठी पत्रकार संघ चाळीसगाव तालुका संघटक तसेच महाराष्ट्र मराठी संपादक पत्रकार संघटना प्रदेश कार्यकारणी सदस्य म्हणूनही काम करत आहेत. याशिवाय त्या शिवसेना (शिंदे गट) जळगाव जिल्हा सदस्य, जिजाऊ ब्रिगेड चाळीसगाव सदस्य आणि हिरकणी महिला मंडळ सदस्य म्हणून सामाजिक कार्यातही योगदान देत आहेत.

कार्यक्रमात बोलताना सुनिता महाडिक यांनी विद्यार्थ्यांना व उपस्थित महिलांना मार्गदर्शन करत शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. महिलांनी आत्मविश्वासाने प्रत्येक क्षेत्रात पुढे जावे, शिक्षण, जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर कोणतेही स्वप्न पूर्ण करता येते, असे त्यांनी सांगितले. तसेच विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहून ती पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावेत, असेही त्यांनी आवाहन केले.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, तरवाडे येथील शिक्षकवृंद आणि व्यवस्थापनाच्या कार्याचेही कौतुक करण्यात आले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी शाळा विविध शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम राबवत असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.

कार्यक्रमाला तरवाडे गावाचे सरपंच, जिल्हा परिषद सदस्य तसेच गावातील अनेक मान्यवर उपस्थित होते. सर्वांनी महिला दिनाचे महत्त्व अधोरेखित करत महिलांच्या सशक्तीकरणासाठी समाजाने एकत्रितपणे काम करण्याची गरज व्यक्त केली.

कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवरांनी सुनिता राजेंद्र महाडिक यांच्या कार्याचे कौतुक करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.