पिंपळगाव बुद्रुकची कन्या कु. पूजा पाटील देशसेवेस सज्ज; ITBP प्रशिक्षण पूर्ण करत गावाचा मान उंचावला :

भुसावळ (प्रतिनिधी ) – पिंपळगाव बुद्रुक (ता. भुसावळ) येथील कु. पूजा सुभाष पाटील यांनी अथक परिश्रम, जिद्द आणि देशसेवेची प्रबळ इच्छा यांच्या जोरावर इंडो तिबेटन बॉर्डर पोलिस ( Indo-Tibetan Border Police )(ITBP) चे कठोर प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले असून त्या आता भारतीय सैन्यदलात देशरक्षणासाठी सज्ज झाल्या आहेत. त्यांच्या या अभूतपूर्व यशामुळे संपूर्ण गावात अभिमान आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. पूजा पाटील यांच्या यशाचा गौरव करण्यासाठी गावकऱ्यांनी त्यांचा भव्य सत्कार आयोजित केला. ढोल-ताशांच्या गजरात आणि उत्साहपूर्ण घोषणांनी गावातून मिरवणूक काढण्यात आली. सर्वत्र “भारत माता की जय” च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.

या प्रसंगी शिवसेना तालुका प्रमुख श्री. निलेशभाऊ ठाकूर तसेच शिवसैनिकांनी ताईंना पुष्पगुच्छ व शाल देऊन सत्कार केला आणि त्यांच्या पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. मान्यवरांनी आपल्या मनोगतातून पूजा यांच्या धैर्य, कर्तव्यनिष्ठा आणि देशभक्तीचे कौतुक केले.

“ताई, आम्हाला तुमचा अभिमान आहे. आपण आपल्या देशाचे रक्षण करणार आहात, ही आमच्यासाठी गौरवाची बाब आहे,” अशा भावना गावकऱ्यांनी व्यक्त केल्या.

पूजा पाटील यांच्या यशामुळे परिसरातील युवक-युवतींना नवी प्रेरणा मिळाली असून, त्यांच्या या कामगिरीमुळे पिंपळगाव बुद्रुकच्या नावाचा गौरव अधिकच वाढला आहे.

. .