लेडीज रनच्या सराव शिबिरास उत्साहात सुरुवात; पहिल्याच दिवशी ५६ महिलांची उपस्थिती :

भुसावळ (प्रतिनिधी) – : भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनतर्फे १२ एप्रिल रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या बिसारा लेडीज इक्वॅलिटी रनच्या पार्श्वभूमीवर सराव शिबिरास उत्साहात प्रारंभ झाला. मंगळवार, ३ मार्च रोजी सकाळी ६ वाजता शहरातील कृष्णचंद्र सभागृहाशेजारील मोकळ्या जागेत पहिल्या सराव सत्राचे आयोजन करण्यात आले. पहिल्याच दिवशी तब्बल ५६ महिलांनी उपस्थिती दर्शवत स्पर्धेबाबतचा उत्साह स्पष्ट केला.

या प्रसंगी जळगावच्या महापौर दीपमाला काळे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. उत्कृष्ट धावपटू व सायकलपटू म्हणून ओळख असलेल्या महापौरांच्या हस्ते तसेच लहान धावपटू अवनी मंगेश चंदन हिच्या हस्ते नारळ फोडून शिबिराचे विधिवत उद्घाटन करण्यात आले.

सुरुवातीला वार्मअपचे व्यायाम घेण्यात आले. त्यानंतर असोसिएशनच्या नियमित महिला धावपटूंसोबत नवोदित स्पर्धकांनी धावण्यास सुरुवात केली. महापौर दीपमाला काळे, डॉ. नीलिमा नेहेते व डॉ. चारुलता पाटील या अग्रस्थानी होत्या. शिस्तबद्ध नियोजन प्रशांत वंजारी यांनी केले. धावपटूंनी मैदान ते डीआरएम कार्यालय–लाल चर्च–लोको शेड रोड असा सुमारे ३ किमीचा टप्पा पूर्ण करत पुन्हा मैदानावर परत येत सत्राची सांगता केली. शेवटी स्ट्रेचिंग व्यायाम घेण्यात आला.

यावेळी डॉ. नीलिमा नेहेते व डॉ. चारुलता पाटील यांनी महापौरांचा सत्कार केला. तसेच उत्कृष्ट धावपटू संजय मोती यांचा सत्कार प्रा. प्रविण फालक यांच्या हस्ते करण्यात आला. आपल्या मनोगतात महापौर दीपमाला काळे यांनी सलग सहाव्यांदा महिलांसाठी विशेष स्पर्धेचे आयोजन केल्याबद्दल असोसिएशनचे कौतुक केले. आपल्या फिटनेस प्रवासातील अनुभव सांगत त्यांनी बाहेरगावी झालेल्या मॅरेथॉन स्पर्धांतील आठवणींनाही उजाळा दिला व भविष्यातही या उपक्रमासाठी सहकार्य करण्याची ग्वाही दिली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. प्रविण फालक होते. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रविण पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी छोटू गवळी, प्रशांत वंजारी, प्रशांत चौधरी, मंगेश चंदन, प्रविण वारके, सुयश न्याती, संजय तिवारी व राजेंद्र घाटे यांचे सहकार्य लाभले.

दरम्यान, स्पर्धकांना योग्य सराव मिळावा यासाठी प्रत्येक मंगळवार, गुरुवार व रविवारी सकाळी ६ ते ७ या वेळेत सराव सत्रे नि:शुल्क आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती असोसिएशनतर्फे देण्यात आली.