विरोदा (ता. यावल) – फैजपूर–भुसावळ मार्गावर बामणोदजवळ रईस हॉटेलसमोर दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन एका तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी (दि. २ मार्च) रात्री घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, युवराज कपले हे बामणोद येथून कर्णछेदनाचा कार्यक्रम आटोपून परत येत असताना भरधाव वेगाने येणाऱ्या लाल रंगाच्या एव्हेंजर (विना क्रमांक प्लेट) दुचाकीने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात कपले यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.
घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी भुसावळ येथील गोल्डन अवर हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती युवराज कपले यांना मृत घोषित केले.
दरम्यान, अपघातानंतर संबंधित अज्ञात दुचाकीस्वार पसार झाला आहे. मध्यरात्री सुमारे १.३० वाजता घटनास्थळी उभी असलेली विना क्रमांक प्लेटची लाल रंगाची एव्हेंजर दुचाकी अज्ञात व्यक्तीकडून हलवण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती समोर आली. भुसावळ येथून परतणाऱ्या ग्रामस्थांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी तत्काळ हस्तक्षेप केला. अपघातग्रस्त दोन्ही दुचाकी पुढील तपासासाठी फैजपूर पोलीस ठाण्यात जमा करण्यात आल्या असून अधिक तपास सुरू आहे.
होळीच्या दिवशी घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे कपले कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी व दोन मुले असा परिवार आहे. या घटनेने विरोदा गावासह परिसरात शोककळा पसरली आहे.


