नक्षत्रा दलाल हिचा नृत्य सादरीकरणाबद्दल गौरव


भुसावळ (प्रतिनिधी) – सुरत (उधना) येथील मेरीमाता पब्लिक स्कूल मध्ये नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमात इयत्ता चौथीची विद्यार्थिनी कु. नक्षत्रा (पुरंध्री) दलाल हिने उत्कृष्ट नृत्य सादर करून उपस्थितांची दाद मिळविली.
भुसावळ येथील ज्येष्ठ शिक्षण नेते प्र. ह. दलाल यांची नात तसेच स्व. आशुतोष व सौ. वैष्णवी दलाल यांची कन्या असलेल्या कु. नक्षत्राने “आईचा जोगवा” या लोकप्रिय महाराष्ट्रीयन गीतावर पारंपरिक वेशभूषेत आकर्षक नृत्य सादर केले. तिच्या हावभावांतील नेमकेपणा, गाण्याशी सुसंगत भावमुद्रा आणि आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणामुळे प्रेक्षकांनी टाळ्यांच्या गजरात तिचे कौतुक केले.
कार्यक्रमप्रसंगी शाळेच्या उपप्राचार्या चित्रा मॅडम यांच्या हस्ते कु. नक्षत्राला पारितोषिक प्रदान करून गौरविण्यात आले. तिच्या या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन, शिक्षकवृंद तसेच पालकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.