जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काहूरखेडे येथे पर्यावरणपूरक धुलीवंदन व होळी उत्साहात साजरी

भुसावळ (प्रतिनिधी ) – भुसावळ तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काहूरखेडे येथे पर्यावरणपूरक होळी व धुलीवंदन उत्साहात साजरी करण्यात आली. विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी एकत्र येत नैसर्गिक रंगांचा वापर करून सण साजरा करत पर्यावरण संरक्षणाचा संदेश दिला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी शाळेच्या मुख्याध्यापिकांनी विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक होळी कशी साजरी करावी याबाबत मार्गदर्शन केले. झाडांची तोड न करता, कमीत कमी लाकूड वापरून होळी प्रज्वलित करावी तसेच पाण्याचा अपव्यय टाळावा, असे आवाहन त्यांनी केले. सण साजरा करताना पर्यावरणाचे जतन करणे ही आपली सामूहिक जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले.

यावेळी उपशिक्षक समाधान जाधव यांनी कृत्रिम रंगांमुळे त्वचा व डोळ्यांवर होणाऱ्या दुष्परिणामांची माहिती विद्यार्थ्यांना दिली. रासायनिक रंगांऐवजी फुलांपासून, हळदीपासून व इतर नैसर्गिक घटकांपासून तयार केलेले रंग वापरण्याचे महत्त्व त्यांनी स्पष्ट केले. पर्यावरणपूरक धुलीवंदन साजरे करून समाजात सकारात्मक संदेश देण्याचे आवाहनही त्यांनी केले.

विद्यार्थ्यांनी फुलांच्या पाकळ्या व नैसर्गिक रंगांचा वापर करून एकमेकांना शुभेच्छा दिल्या. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाबाबत जागरूकता निर्माण झाली असून शाळेच्या या अभिनव उपक्रमाचे ग्रामस्थांनीही कौतुक केले आहे.