भुसावळ (प्रतिनिधी ) – शिवसेना जिल्हा प्रमुख समाधान महाजन यांनी पाटबंधारे विभागाचे उपकार्यकारी अभियंता .तु.सु. महाजन यांची भेट घेऊन वरणगावसह परिसरातील पाणीटंचाईच्या प्रश्नावर सविस्तर चर्चा केली.

तापी नदी शेजारी असतानाही हतनुर धरणाच्या खालच्या भागात नदीपात्रातील पाणीपातळी कमी होत असल्याने वरणगाव शहरासह फुलगाव, अंजनसोंडे, कठोरे आदी ग्रामीण भागात कायमस्वरूपी पाणीटंचाई निर्माण होत असल्याची बाब त्यांनी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली.
धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या आवर्तनाचे प्रमाण आणि नदीपात्रातील पाणीउचल यामधील तफावत पाहता पाणीटंचाईस पाटबंधारे विभागच जबाबदार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच धरणातील पाण्याचे आरक्षण, आवर्तनावेळी होणारा विसर्ग आणि नदीपात्रातील पाणीउचल यांचा अचूक हिशोब ठेवून नियोजन करावे, जेणेकरून येत्या उन्हाळ्यात वरणगाव शहर व ग्रामीण भागातील गावांना पाणीपुरवठा कमी पडणार नाही, अशी मागणी केली.
नियोजनात त्रुटी राहिल्यास ‘शिवसेना स्टाईल’ने आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
दरम्यान, उपकार्यकारी अभियंता यांनी नियत वेळापत्रकानुसार (४५ दिवसांचे आवर्तन) आजच पाणी सोडण्यात आल्याचे सांगितले. पुढील काळात नदीपात्रातील पाणीपातळी कमी होऊन वरणगाव शहर व ग्रामीण भागात पाणीटंचाई निर्माण होणार नाही, यासाठी आवश्यक ते नियोजन करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले.


