फैजपूर (प्रतिनिधी): खान्देशवासीयांचे आराध्य दैवत खंडोबा महाराज यांच्या फैजपूर येथील भव्य यात्रोत्सवाला भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला आहे. “यळकोट यळकोट जय मल्हार”च्या गजरात २ मार्च रोजी भंडाऱ्याची उधळण करून यात्रेचा शुभारंभ करण्यात येणार असून २ ते ९ मार्चदरम्यान आठ दिवस विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी परिसर दुमदुमणार आहे.

महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश व इतर राज्यांतून व्यापारी आणि भाविक मोठ्या संख्येने दाखल होत आहेत. दरवर्षी लाखो भाविक या यात्रेस उपस्थित राहतात. कर्णछेदनासारखे धार्मिक विधीही मोठ्या प्रमाणावर पार पडतात.
ऐतिहासिक परंपरा
सुमारे २०० वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या या देवस्थानातील मूर्ती अत्यंत प्राचीन असून ती इंदूरच्या होळकर सरकारांची देणगी असल्याचे सांगितले जाते. मूर्ती न्हावी गावाकडे नेत असताना बैलगाडी अचानक थांबल्याची आख्यायिका प्रचलित आहे. त्यानंतर फैजपूरवासीयांना स्वप्नदृष्टांत झाल्याने याच ठिकाणी प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. फाल्गुन शुद्ध पौर्णिमेपासून येथे यात्रा भरण्याची परंपरा सुरू आहे.

नियोजन व धार्मिक कार्यक्रम
यात्रेचे नियोजन खंडोबा देवस्थानचे गादीपती महामंडलेश्वर पुरुषोत्तमदासजी महाराज, उत्तराधिकारी महामंडलेश्वर पवनदासजी महाराज व पुजारी राम मनोहरदाजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. संत-महंत, लोकप्रतिनिधी व नगरवासीयांच्या सहकार्याने सोहळा भव्य करण्याचा संकल्प करण्यात आला आहे.
देवस्थान परिसरात दररोज सकाळ-संध्याकाळ शिवस्तुती, रामरक्षा, रामस्तुती, जानकीस्तुती व खंडोबास्तुतीचे कार्यक्रम सुरू आहेत. विविध पंथ-संप्रदायांना एकत्र आणण्याचे कार्य विशेष कौतुकास्पद मानले जात आहे.
प्रशासन सज्ज
यात्रोत्सव शांततामय व सुरक्षित वातावरणात पार पडावा यासाठी पोलीस, महसूल व नगरपालिका प्रशासन सज्ज झाले आहे. पोलीस अधिकारी व कर्मचारी, होमगार्ड दल तसेच दक्षता समितीचे कार्यकर्ते तैनात असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी विशेष दक्षता घेण्यात येत आहे.
भाविकांसाठी मोफत वैद्यकीय पथक अहोरात्र उपलब्ध ठेवण्यात आले असून वीजपुरवठा सुरळीत राहावा यासाठी वीज वितरण कंपनीचे अधिकारी प्रयत्नशील आहेत.
विविध उपक्रमांनी गजबज
यात्रेत मनोरंजन कार्यक्रम, भांड्यांची दुकाने, खाद्यपदार्थांचे स्टॉल, पाळणे, मौत का कुवा, लोकनाट्य तसेच विविध व्यापारी उपक्रमांमुळे परिसर गजबजला आहे. धार्मिक, सामाजिक आणि आर्थिक उत्सवासाठी फैजपूर नगरी सज्ज झाली आहे.
यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.


