भुसावळ (प्रतिनिधी) – जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनतर्फे यावर्षीही खास महिलांसाठी ‘बिसारा लेडीज इक्वॅलिटी रन’चे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा रविवार, १२ एप्रिल रोजी पार पडणार आहे. या अनुषंगाने असोसिएशनच्या नियमित धावपटूंची बैठक नुकतीच डॉ. चारुलता पाटील व डॉ. तुषार पाटील यांच्या निवासस्थानी संपन्न झाली.

मार्च महिन्यात शालेय परीक्षा तसेच महिला दिनानिमित्त विविध शासकीय व सामाजिक कार्यक्रमांमुळे महिलांना सहभागी होण्यात अडचणी येतात. अधिकाधिक महिला व विद्यार्थिनींना संधी मिळावी यासाठी स्पर्धा एप्रिलमध्ये घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती अध्यक्ष प्रा. प्रविण फालक यांनी दिली.
स्पर्धेच्या समन्वयकपदी डॉ. निलीमा नेहेते व डॉ. चारुलता पाटील यांची एकमुखाने निवड करण्यात आली. यावर्षी नावनोंदणी केवळ ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे.
स्पर्धा ३ किमी, ५ किमी व १० किमी अशा तीन गटांत होणार असून प्रत्येक सहभागीला स्पर्धेच्या आदल्या दिवशी टी-शर्ट देण्यात येईल. धाव पूर्ण केल्यानंतर पदक व प्रमाणपत्र प्रदान करण्यात येईल. ५ किमी व १० किमी गट ‘टायमिंग रन’ स्वरूपात असून आरएफआयडी प्रणालीद्वारे प्रत्येक धावपटूस स्वतंत्र बिब क्रमांक देण्यात येईल. धाव पूर्ण झाल्यानंतर सहभागींच्या भ्रमणध्वनीवर अधिकृत वेळेचा संदेश पाठविण्यात येणार आहे.
विजेत्या स्पर्धकांना रोख पारितोषिके व स्मृतिचिन्हे देण्यात येतील, तसेच इतर स्पर्धकांसाठी लकी ड्रॉद्वारे आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. धावपटूंच्या सोयीसाठी मार्गावर पेयजल, एनर्जी ड्रिंक व खाद्यपदार्थांची व्यवस्था केली जाणार असून मैदानावर सर्वांसाठी नाश्त्याची सोय असेल.
ऑनलाईन नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून अल्पावधीत १०० हून अधिक महिलांनी नावनोंदणी केल्याची माहिती प्रविण पाटील यांनी दिली.
धाव सुरक्षित व आनंददायी व्हावी या उद्देशाने दर मंगळवार, गुरुवार व रविवारी सकाळी ६ ते ७ या वेळेत शहरातील कृष्णचंद्र सभागृहाशेजारील मोकळ्या जागेत विनामूल्य सराव सत्रांचे आयोजन करण्यात येणार आहे. एकूण १५ सराव सत्रे घेण्यात येणार असून याची सुरुवात मंगळवार, ३ मार्चपासून होणार आहे.
बैठकीस गणसिंग पाटील, प्रशांत चौधरी, प्रशांत वंजारी, संजय तिवारी, नीलकंठ नेमाडे, प्रमोद शुक्ला, संजय चौधरी आदींसह असोसिएशनच्या महिला धावपटू मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
फोटो ओळ -लेडीज रन संदर्भात चर्चा करण्यासाठी बोलाविण्यात आलेल्या बैठकीत उपस्थित भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर असोसिएशनचे धावपटू


