रेल्वे प्रवासासाठी ‘रेलवन अ‍ॅप’ हे एकात्मिक डिजिटल व्यासपीठ; ‘यूटीएस ऑन मोबाइल अ‍ॅप’ १ मार्चपासून बंद :

भुसावळ (प्रतिनिधी ) – प्रवाशांच्या सोयीसाठी डिजिटल सेवांचे एकत्रीकरण करत भारतीय रेल्वेने “रेलवन अ‍ॅप” हे सर्वसमावेशक डिजिटल व्यासपीठ सुरू केले असून १ मार्च २०२६ पासून “यूटीएस ऑन मोबाइल अ‍ॅप” बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. अनारक्षित तिकीट बुकिंगसह रेल्वे प्रवासाशी संबंधित सर्व सुविधा आता एकाच अ‍ॅपवर उपलब्ध होणार आहेत.

रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार, सध्या अनारक्षित तिकीट बुकिंगसाठी वापरले जाणारे “यूटीएस ऑन मोबाइल अ‍ॅप” १ मार्चपासून कार्यरत राहणार नाही. या अ‍ॅपवरील सर्व सेवा “रेलवन अ‍ॅप”मध्ये समाविष्ट करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना वेगवेगळी अ‍ॅप्स वापरण्याची गरज भासणार नाही. विशेष म्हणजे, रेलवन अ‍ॅपवर अनारक्षित तिकीट बुकिंगवर १४ जून २०२६ पर्यंत प्रायोगिक तत्त्वावर ३ टक्के सवलत दिली जात आहे.

सध्या “यूटीएस ऑन मोबाइल अ‍ॅप” वापरणाऱ्या प्रवाशांना नव्याने नोंदणी करण्याची आवश्यकता नसून ते त्यांच्या विद्यमान वापरकर्ता आयडीद्वारे थेट “रेलवन अ‍ॅप”वर लॉगिन करू शकतात. सिंगल साइन-ऑन सुविधेमुळे रेलकनेक्ट किंवा यूटीएस ऑन मोबाइलचा आयडी वापरून प्रवेश मिळणार आहे.

याशिवाय, यूटीएस अ‍ॅपवर बुक केलेल्या सिझन तिकिटांसाठी ‘Show Ticket’ विभागात “Transfer Ticket” हा नवीन पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. यामुळे प्रवाशांना सिझन तिकीट सहजपणे हस्तांतरित करता येणार आहे.

“रेलवन अ‍ॅप”द्वारे आरक्षित व अनारक्षित तिकीट बुकिंग, प्लॅटफॉर्म तिकीट, लाईव्ह ट्रेन स्थिती, पीएनआर तपशील, तिकीट रद्द करणे व परतावा, रेल मदत सेवा, तक्रार नोंदणी व निवारण तसेच गाडीत भोजन बुकिंग अशा सर्व सुविधा एकाच व्यासपीठावर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. रेल्वे ई-वॉलेटची सुविधाही अ‍ॅपमध्ये समाविष्ट करण्यात आली आहे.

रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना “रेलवन अ‍ॅप” डाउनलोड करून यूटीएस ऑन मोबाइल अ‍ॅपवरून नव्या अ‍ॅपवर स्थलांतर करण्याचे आवाहन केले आहे. एकात्मिक डिजिटल सेवांमुळे रेल्वे प्रवास अधिक सुलभ, पारदर्शक आणि सोयीस्कर होणार असल्याचा विश्वास रेल्वेने व्यक्त केला आहे.