तिथीनुसार श्री छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळ्याचे भुसावळात आयोजन :

भुसावळ (प्रतिनिधी): दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळा समिती २०२६ तर्फे भव्य-दिव्य शिवजन्मोत्सव सोहळा तिथीनुसार शुक्रवार, दि. ६ मार्च २०२६ रोजी सांस्कृतिक पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे.

या निमित्ताने गुरुवार, दि. ५ मार्च २०२६ रोजी रात्री १२ वाजता जन्मोत्सव जल्लोषाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी प्रयागराज कुंभ गंगाभिषेक, जलाभिषेक व दुग्धाभिषेक, आरती व पूजन, करण्यात येईल तसेच पाळणा (सजीव आरास), सादर होईल.आतिषबाजी, शिवचरित्र कथन, आकर्षक शिवशाही सजावट व विद्युत रोषणाई आदी कार्यक्रम होणार आहेत.

तसेच शुक्रवार, दि. ६ मार्च २०२६ रोजी सकाळी ९ वाजता भव्य शिवशाही मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. रॅलीचा प्रारंभ नाहाटा कॉलेज येथून होऊन पांडुरंग टॉकीज, सातारा पूल, सरदार वल्लभभाई स्मारक, गांधी पुतळा, लोखंडी पुलाखालून, स्टेशन रोड, श्री छत्रपती स्मारक ते मॉर्डन रोड, गांधी चौक, स्मारक बाजार, जवाहर डेअरी मार्गे टिंबर मार्केट स्मारक येथे समारोप होणार आहे.

दुपारी १२ वाजता छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, रेल्वे स्टेशन परिसर, भुसावळ येथे अन्नदान कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

याच दिवशी संध्याकाळी ७ वाजता ‘शिवभूषण पुरस्कार’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून शहरातील सामाजिक सेवेमध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्यात येणार आहे.

या सर्व कार्यक्रमांना शिवभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्साहात शिवजन्मोत्सव साजरा करावा, असे आवाहन उत्सव समितीने केले आहे.