रावेर तालुक्यात महिलेचा विनयभंग; जातीवाचक शिवीगाळ प्रकरणी गुन्हा दाखल

रावेर (प्रतिनिधी) — रावेर तालुकातील एका गावात २५ वर्षीय महिलेचा पाठलाग करून तिचा विनयभंग केल्याची तसेच जातीवाचक शिवीगाळ करून अपमान केल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या प्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून रावेर पोलीस ठाणे येथे संशयित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पहाटेची घटना

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला २१ फेब्रुवारी रोजी पहाटे सुमारे ५.३० वाजता प्रातर्विधीसाठी गावाजवळील रस्त्याने जात होती. त्यावेळी संशयित आरोपी सुरेश बळीराम पाटील याने तिचा पाठलाग केला. वाटेत अडवून त्याने महिलेकडे अश्लील मागणी करत “तुला किती पैसे लागतील ते देतो, माझ्यासोबत चल,” असे म्हणत तिचा विनयभंग केल्याचा आरोप आहे.

जातीवाचक वक्तव्याने मानहानी

पीडितेने या प्रकाराला विरोध केला असता आरोपीने तिच्या समाजाबद्दल आक्षेपार्ह आणि जातीवाचक शब्दांचा वापर केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. “तुमच्या समाजातील स्त्रिया हेच काम करतात,” असे हीन वक्तव्य करून तिची सामाजिक व मानसिक मानहानी केल्याचा आरोप आहे.

ॲट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा

या घटनेनंतर घाबरलेल्या पीडितेने तात्काळ पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध विनयभंगासह अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा (ॲट्रॉसिटी) अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.