जळगाव (प्रतिनिधी) — सामाजिक ऐक्य आणि साधेपणाचा आदर्श ठेवत अखिल भारतीय लेवा पाटीदार युवक महासंघ व बहिणाई ब्रिगेड यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (२२ फेब्रुवारी) जळगावात भव्य सामूहिक विवाह सोहळा पार पडला. या मंगलमय सोहळ्यात १९ जोडपी विवाहबंधनात अडकली. राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला ‘शाही’ स्वरूप लाभले.

बैलगाडी मिरवणुकीने जपली परंपरा

सोहळ्याची सुरुवात सकाळी ११ वाजता जुन्या जळगावातील ऐतिहासिक विठ्ठल मंदिर येथून झाली. आधुनिक वाहनांचा थाट टाळत सर्व नवरदेव सजवलेल्या बैलगाड्यांवर स्वार झाले होते. संभळ, टाळ-मृदुंगाचा गजर आणि महिलांनी धरलेला फुगड्यांचा फेर यामुळे शहर लेवा संस्कृतीच्या रंगात न्हाऊन निघाले. मिरवणूक शहरातील प्रमुख मार्गांवरून जात काशीबाई कोल्हे शाळेजवळील मीराई लॉन येथे पोहोचली.
मान्यवरांची उपस्थिती
या सोहळ्याला केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांनी उपस्थित राहून नवदाम्पत्यांना आशीर्वाद दिले. त्यांच्यासह महापौर दीपमाला काळे, आमदार राजूमामा भोळे, गोदावरी फाउंडेशनच्या संचालिका केतकीताई पाटील, युवा नेते धनंजय चौधरी आणि हभप भरत महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती.
नियोजनाचा ‘बहिणाई’ पॅटर्न
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी लेवा एज्युकेशन युनियनचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. बहिणाई ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षा आशाताई कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला आघाडीने चोख नियोजन केले. युवक महासंघाचे पदाधिकारी प्रकाशराव पाटील, राजेश चौधरी, प्रदेशाध्यक्ष प्रदीप भोळे आणि जिल्हाध्यक्ष मधुकर भंगाळे यांनी या उपक्रमातून समाजाला एकतेचा संदेश दिला.
खर्चाला फाटा, संसाराला आधार
अवाढव्य खर्च टाळून सर्वसामान्य कुटुंबांवरील आर्थिक भार हलका करण्याच्या या उपक्रमाचे मान्यवरांनी कौतुक केले. सोहळ्याच्या शेवटी सर्व नवविवाहित जोडप्यांना आयोजकांतर्फे संसारोपयोगी वस्तू भेट देण्यात आल्या. जिल्हाभरातून लेवा पाटीदार समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याने ‘मीराई लॉन’ परिसर जनसागराने फुलून गेला.



