भुसावळ (प्रतिनिधी ) – येथील श्री पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ज्येष्ठ महिला मंडळाचे हळदीकुंकू व सर्वसाधारण सभा नेहमीप्रमाणे शांततेत, आनंदी वातावरणात व उत्साहात पार पडली . स्थानिक श्रीराम मंदिर सभागृहात आयोजित ज्ञानवर्धक, संस्कृती जपणारी व आनंददायी अशी ही सभा ठरली. यानिमित्त विधी सेवा समितीच्या वतीने आयोजित विशेष कार्यक्रमात ज्येष्ठ महिलांसाठी उपयुक्त व महत्त्वाच्या कायद्यांची माहिती देण्यात आली. संविधानात नमूद असलेल्या विविध कायद्यांबाबत अॅडव्होकेट निलेश भंडारी तसेच सौ. जास्वंदी भंडारी व उज्वला बागुल यांनी मार्गदर्शन करून महिलांना उपयुक्त अशी मोलाची माहिती दिली.


संक्रांतीनिमित्त पर्यावरणपूरक उपक्रम राबवित हळदीकुंकू व वाण म्हणून गुळाच्या ढेप व कापडी पिशव्या देण्यात आल्या. नाश्त्यासाठी चिरोटे व भडंग चिवडा मंडळाच्या अध्यक्षा सौ. सुनंदाताई औंधकर यांनी स्वतः बनवून आणला होता. त्यांच्या हातच्या नाश्त्याची खास चव उपस्थित सर्व महिलांनी मनमुराद अनुभवली. सूत्रसंचलन सौ सीमा डोलारे यांनी केले तर आभार प्रभावती पाटील यांनी केले .
कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले ज्येष्ठांचे वाढदिवस….

अध्यक्ष सौ औंधकर यांनी मंडळाचे कार्य , कामकाज बाबत महत्वपूर्ण माहिती देऊन बौद्धिक ज्ञान वाढविण्यासाठी प्रश्नमंजुषा खेळ घेतला . तसेच संस्कृतीचे जतन करत मंत्रोच्चारांच्या गजरात औक्षण करून ज्येष्ठ सखी सौ. प्रमिला बऱ्हाटे, जयश्री ढाके, मंगला पांचपांडे, सुहासिनी क्षीरसागर, विजया निकम, शारदा झोपे, आशा इंगळे व शीला उपाध्ये आदी सख्यांचे वाढदिवस साजरे केले.
वया वेळी व्यासपीठावर मंडळाच्या अध्यक्षा सौ. सुनंदा औंधकर, सचिव सौ. सीमा डोलारे, कोषाध्यक्ष सौ. सरोज कवीश्वर, सौ. अलका ढाके आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमास मंडळाच्या महिला सदस्यां , जेष्ठ महिलाची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. यशस्वीतेसाठी मंडळ सदस्यांनी परिश्रम घेतले.


