भुसावळात ‘बुद्धं सरणं गच्छामि’च्या जयघोषात भव्य धम्मरॅली उत्साहात संपन्न! वर्षावास समापनानिमित्त धम्मशील बौद्ध विहाराचा उपक्रम; परिसरात नवचैतन्य आणि मंगलमय वातावरण भुसावळ (प्रतिनिधी) : शहरातील गांधीनगर परिसरात स्वतेज बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्था व धम्मशील महिला संघ यांच्या संयुक्त विद्यमाने वर्षावास समापनानिमित्त भव्य धम्मरॅलीचे आयोजन करण्यात आले होते. ‘बुद्धं सरणं गच्छामि… धम्मं सरणं गच्छामि… संघं सरणं गच्छामि…’ या बुद्धवंदनेच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. शांतताप्रिय आणि शिस्तबद्ध पद्धतीने निघालेल्या या धम्मरॅलीमुळे परिसरात नवचैतन्य, उत्साह आणि मंगलमय वातावरण निर्माण झाले होते. दरवर्षीप्रमाणे यंदाही सोमवार, दि. २६ ऑक्टोबर रोजी सकाळी ९.३० वाजता धम्मरॅलीला प्रारंभ झाला. धम्मशील बौद्ध विहारापासून निघालेली ही रॅली गुंजाळ कॉलनी, खडका रोड, गडकरी नगर आणि रिंगरोड मार्गे मार्गस्थ झाली. रॅलीच्या मार्गावर ठिकठिकाणी पूज्य भन्ते डॉ. हर्षबोधी महाथेरो, पूज्य भन्ते नागसेन आणि पूज्य भन्ते मुदितानंद यांचे पाय धुऊन, गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. उपासिकांनी आकर्षक रांगोळ्या काढून तसेच फुलांचा सडा टाकून धम्मरॅलीचे स्वागत केले. तीन महिने मिलिंद प्रश्न ग्रंथाचे वाचन आषाढ पौर्णिमेपासून अश्विन पौर्णिमेपर्यंत धम्मशील बौद्ध विहारात वर्षावासानिमित्त तीन महिन्यांपासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या काळात पूज्य भन्ते डॉ. हर्षबोधी महाथेरो, रविंद्र कांबळे आणि व्ही. टी. शेजवळ यांनी ‘मिलिंद प्रश्न’ या ग्रंथाचे वाचन केले. या ग्रंथवाचनाचा बौद्ध उपासक, उपासिका आणि बालकांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला. धम्मदेसनेतून दिला विचारांचा संदेश धम्मरॅलीचा समारोप धम्मशील बौद्ध विहारात झाला. त्यानंतर पूज्य भन्ते डॉ. हर्षबोधी महाथेरो यांनी उपस्थित उपासक-उपासिकांना धम्मदेसना दिली. दुपारी १ वाजल्यापासून उपस्थितांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. सायंकाळी ६.३० वाजता पूज्य भन्ते डॉ. हर्षबोधी महाथेरो यांच्या हस्ते धम्मशील बौद्ध विहाराच्या बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले. पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे परिश्रम कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी स्वतेज बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्थेचे अध्यक्ष रविंद्र कांबळे, कोषाध्यक्ष राजेंद्र तायडे, व्ही. टी. शेजवळ, आनंद सपकाळे, रविंद्र सावदेकर, दीक्षा सोनवणे, चंदा सोनवणे, आशा सावदेकर यांच्यासह धम्मशील महिला मंडळाच्या पदाधिकारी व उपासिकांनी परिश्रम घेतले.


