भुसावळ (प्रतिनिधी) : विधी सेवा समिती, भुसावळ यांच्या वतीने पॉक्सो (POCSO) कायदा २०१२ जनजागृती अभियानांतर्गत ‘सुरक्षित बचपन’ हा कार्यक्रम दि. २७ ऑक्टोबर २०२६ रोजी तापी नगर येथील के. नारखेडे विद्यालयात आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण, कायद्याची माहिती तसेच प्रतिकूल परिस्थितीला धैर्याने कसे सामोरे जावे, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमाला सहदिवाणी न्यायाधीश श्री. ए. एम. कुलकर्णी आणि ॲड. प्रिया अडकमोल यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांनी विद्यार्थ्यांना पॉक्सो कायदा २०१२ मधील महत्त्वाच्या तरतुदी समजावून सांगितल्या. तसेच एखाद्या विद्यार्थ्याला अनुचित प्रसंगाला सामोरे जावे लागल्यास घाबरून न जाता परिस्थिती कशी हाताळावी, विश्वासू व्यक्तीला कशी माहिती द्यावी आणि योग्य मदत कशी घ्यावी, याविषयी मार्गदर्शन केले. न्यायिक अधिकारी व विधी सेवा समितीचा पुढाकार या जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन वरिष्ठ लिपिक श्री. गणेश निंबाळकर, श्री. प्रज्वल दुतोंडे आणि पॅरा लीगल व्हॉलंटिअर (पीएलव्ही) श्रीमती स्वाती भोळे यांच्या समन्वयातून करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिपाई श्री. राहुल रायपुरे यांनीही सहकार्य केले. के. नारखेडे विद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती संगीता अडकमोल, अध्यक्ष श्री. पी. व्ही. पाटील आणि श्री. राणे यांचेही कार्यक्रमासाठी सहकार्य लाभले. विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न बालकांचे संरक्षण, त्यांचे अधिकार आणि कायद्याच्या मदतीने सुरक्षितता मिळविण्याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. अशा जनजागृती कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या अधिकारांची माहिती मिळून संकटाच्या प्रसंगी योग्य निर्णय घेण्यास मदत होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती एम. आर. सोनवणे यांनी केले. शेवटी एस. एल. सरांनी आभार प्रदर्शन केले आणि कार्यक्रमाची सांगता झाली.


