लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त भुसावळात भव्य शोभायात्रा !लोहपुरुषांचा जयजयकार, वारकरी संप्रदायाचा गजर’; सकल लेवा समाजातर्फे आयोजन, शोभायात्रेनंतर महाप्रसादाची व्यवस्था ;

.भुसावळ (प्रतिनिधी) : भारतरत्न, देशाचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त शनिवार, दि. ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी भुसावळ शहरात सकल लेवा समाज, भुसावळ तालुका (पाटील) समाजाच्या वतीने भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘लोहपुरुषांचा जयजयकार, वारकरी संप्रदायाचा गजर’ या संकल्पनेवर आधारित या शोभायात्रेतून राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक ऐक्य आणि देशाच्या अखंडतेचा संदेश दिला जाणार आहे.

अष्टभुजा माता मंदिरापासून शोभायात्रेला प्रारंभ

ही शोभायात्रा शनिवार, दि. ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी ८.३० वाजता जामनेर रोडवरील श्री अष्टभुजा माता मंदिर येथून निघणार आहे. शोभायात्रेत समाजबांधवांसह टाळकरी, माळकरी, वारकरी तसेच सरदार वल्लभभाई पटेल यांना प्रेरणास्थान मानणाऱ्या नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

टाळ-मृदंगाच्या गजरात लोहपुरुषांचा जयघोष

शोभायात्रेला आध्यात्मिक आणि सांस्कृतिक स्वरूप देण्यात आले आहे. टाळ-मृदंगाचा निनाद, भजनांचे मधुर सूर आणि सरदार वल्लभभाई पटेल यांचा जयघोष अशा भक्तिमय वातावरणात ही शोभायात्रा पार पडणार आहे. देशाची एकता आणि अखंडता टिकवून ठेवण्यासाठी सरदार पटेल यांनी दिलेल्या योगदानाचे स्मरण करून त्यांच्या विचारांना अभिवादन करण्यात येणार आहे.

पारंपरिक वेशभूषेत सहभागी होण्याचे आवाहन

या शोभायात्रेत सहभागी होणाऱ्या समाजबांधवांनी, वारकरी आणि नागरिकांनी आपल्या कुटुंबीयांसह पारंपरिक वेशभूषेत उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांचा सहभाग सामाजिक एकता, बंधुभाव आणि राष्ट्रीय अखंडतेचा संदेश अधिक प्रभावीपणे पोहोचविण्यास महत्त्वाचा ठरणार आहे.

शोभायात्रेनंतर महाप्रसादाची व्यवस्था

शोभायात्रेनंतर उपस्थित नागरिकांसाठी महाप्रसाद व भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे भुसावळ शहरासह तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमात सहभागी व्हावे आणि लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांना कृतज्ञतापूर्वक अभिवादन करावे, असे आवाहन सकल लेवा समाज, भुसावळ तालुका यांच्या वतीने करण्यात आले आहे.

— आयोजक, सकल लेवा समाज, भुसावळ तालुका