भुसावळ विभागात तक्रार निवारण दिन; 90 पैकी 42 अर्ज निकाली :

भुसावळ (प्रतिनिधी) –
पोलिस आणि नागरिक यांच्यातील सलोखा वाढवण्यासाठी तसेच प्रलंबित तक्रार अर्जांचा जलद निपटारा करण्याच्या उद्देशाने शनिवार, 24 रोजी भुसावळ विभागात तक्रार निवारण दिन राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत शहर, बाजारपेठ आणि तालुका पोलिस ठाण्यात एकूण 90 तक्रार अर्ज सुनावणीसाठी आले.

यापैकी 42 अर्जांमध्ये दोन्ही पक्षांमध्ये समन्वय साधत जागीच तोडगा काढण्यात आला, तर उर्वरित 48 अर्जांवर कायदेशीर प्रक्रिया सुरू असून ते सध्या प्रलंबित आहेत.

ही मोहीम डीवायएसपी केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळ विभागातील तिन्ही पोलिस ठाण्यांत राबविण्यात आली. अनेकदा किरकोळ कारणांमुळे तक्रारी प्रलंबित राहतात. अशा प्रकरणांत प्रभारी अधिकाऱ्यांनी तक्रारदार व समोरच्या पक्षाला पाचारण करून थेट संवाद साधला. यामुळे अनेक कौटुंबिक तसेच शेजारील वाद सामंजस्याने मिटले.

शहर पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक उद्धव डमाळे, तर तालुका पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक महेश गायकवाड यांनी स्वतः तक्रारदारांच्या समस्या जाणून घेतल्या. वरिष्ठ कार्यालयांकडून प्राप्त झालेल्या 62 अर्जांपैकी 33 अर्ज निकाली काढण्यात आले असून 29 अर्ज प्रलंबित आहेत. तसेच पोलिस ठाणे स्तरावर प्राप्त 28 अर्जांपैकी 9 अर्ज निकाली निघाले असून 19 अर्जांवर प्रक्रिया सुरू आहे.

या उपक्रमामुळे नागरिकांना थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर आपली बाजू मांडण्याची संधी मिळाली. प्रलंबित 48 अर्जांचा तपास लवकर पूर्ण करून ते निकाली काढण्याचे निर्देश संबंधित तपास अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. अर्ज निकाली न निघाल्यास तात्काळ गुन्हा दाखल करून फाईल करण्याच्या सूचनाही डीवायएसपी बारबोले यांनी दिल्या.

दरम्यान, जे अर्जदार शनिवारी उपस्थित राहू शकले नाहीत, त्यांनी पुढील शनिवारी संबंधित पोलिस ठाण्याशी संपर्क साधून आपल्या अर्जावर झालेल्या कारवाईची माहिती घ्यावी, असे आवाहन पोलिस उपअधीक्षक केदार बारबोले यांनी केले आहे.