अमळनेरच्या तरुणाची नाशिकमध्ये आत्महत्या; सुसाईड नोटमध्ये धमक्या आणि त्रास दिल्याचा उल्लेख, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

अमळनेर (प्रतिनिधी) - अमळनेर येथील पवन राजेंद्र देसले (वय २८) या तरुणाचा नाशिक येथे घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २५ ऑक्टोबर रोजी उघडकीस आली. नाशिकमधील राहत्या खोलीत त्याने गळफास घेतल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पवनच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून एका तरुणीसह चौघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा एमआयडीसी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

पवन देसले याने इलेक्ट्रिकल डिप्लोमा पूर्ण केला होता. तो नाशिकमधील एका खासगी कंपनीत नोकरीला होता. साधारण पंधरा दिवसांनी तो अमळनेर येथे आई-वडिलांना भेटण्यासाठी येत असे. २५ ऑक्टोबर रोजी दुपारी तीनच्या सुमारास त्याच्यासोबत खोलीत राहणाऱ्या हर्षल जैन याने मित्राच्या फोनवरून पवनच्या वडिलांना संपर्क साधला. पवनने खोलीत गळफास घेतल्याची माहिती त्याने दिली. त्यानंतर नातेवाइकांनी घटनास्थळी धाव घेतली....पवन २० ऑक्टोबर रोजी अमळनेर येथे आला असताना तो मानसिक तणावाखाली असल्याचे आई-वडिलांच्या लक्षात आले होते. त्यांनी त्याला विश्वासात घेऊन विचारणा केली असता, ओळखीतील जयदीप पाटील, हेमंत जाधव आणि अन्य दोन तरुणी आपल्याला सातत्याने त्रास देत असून धमकावत असल्याचे त्याने सांगितल्याचा उल्लेख फिर्यादीत आहे. या त्रासाला कंटाळून पवनने टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप त्याच्या वडिलांनी फिर्यादीत केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

पवनने मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत संबंधित चौघांची नावे नमूद केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. संबंधित व्यक्तींकडून वारंवार त्रास दिला जात असल्याचा तसेच मारहाण झाल्याचा आरोप त्याने चिठ्ठीत केल्याचे सांगण्यात आले आहे. एका तरुणीच्या सांगण्यावरून आपल्याला दोन-तीन वेळा मारहाण झाल्याचा उल्लेखही त्यात असल्याचे वृत्त आहे.....तसेच, दुसऱ्या तरुणीला पैसे दिल्याचा आणि तिने फोन-पेवर ब्लॉक केल्यामुळे व्यवहारांची माहिती उपलब्ध होणार नसल्याचा उल्लेख चिठ्ठीत असल्याचे समजते. संबंधितांना सोडू नये, अशी विनंतीही त्याने चिठ्ठीत केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या प्रकरणातील आरोपांची सत्यता तपासानंतर स्पष्ट होणार असून, पोलिसांकडून पुढील तपास केला जात आहे.