मुंबई : राज्यात सध्या महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून, त्यानंतर आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशातच जिल्हा परिषद निवडणुकांच्या तारखांबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. येत्या चार ते आठ दिवसांत जिल्हा परिषद निवडणुका जाहीर होतील, असा अंदाज महायुतीमधील मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे झेडपी निवडणुकांचा धुरळा याच आठवड्यात उडण्याची शक्यता आहे.

सर्वोच्च न्यायालयाने ३१ जानेवारी २०२६ पर्यंत राज्यातील सर्व स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार पहिल्या टप्प्यात नगर परिषद आणि नगर पंचायतींच्या निवडणुका पार पडल्या आहेत. आरक्षणाच्या मुद्द्यामुळे दुसऱ्या टप्प्यात २९ महापालिकांच्या निवडणुका सुरू आहेत.
दरम्यान, नगरपरिषद निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर आता तिसऱ्या टप्प्यात ३२ जिल्हा परिषद आणि ३३१ पंचायत समित्यांच्या निवडणुका होणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या निवडणुकांची घोषणा डिसेंबर अखेरीस होण्याची दाट शक्यता आहे.
जळगावसह रायगड, रत्नागिरी, पुणे, कोल्हापूर, नाशिक, सोलापूर, नांदेड, बीड, अहमदनगर आणि अमरावती यांसारख्या अनेक महत्त्वाच्या जिल्ह्यांमधील जिल्हा परिषदांच्या निवडणुका सध्या प्रलंबित आहेत. या सर्व जिल्ह्यांमध्ये लवकरच निवडणूक प्रक्रिया सुरू होण्याची चिन्हे आहेत.
जिल्हा परिषद निवडणुकांचे संभाव्य वेळापत्रक
- निवडणूक जाहीर : या आठवड्याच्या अखेरीस किंवा सोमवारी
- अर्ज स्वीकारण्याची मुदत : ७ दिवस
- अर्ज मागे घेण्याची मुदत : २ दिवस
- छाननी व अंतिम उमेदवार यादी : अर्ज प्रक्रियेनंतर
- मतदान व निकाल : २८ किंवा २९ जानेवारी २०२६
- संपूर्ण प्रक्रिया पूर्ण : ३१ जानेवारी २०२६ पूर्वी
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार निवडणूक आयोगाने ३१ जानेवारीपूर्वी जिल्हा परिषद निवडणुका पूर्ण करण्याचा निर्धार केला असून, त्यामुळे नववर्षाच्या सुरुवातीलाच राज्यातील ग्रामीण राजकारण तापण्याची शक्यता आहे.


