भुसावळ दि. २२ डिसेंबर २०२५
भुसावळ उपविभागाच्या पोलिस उपअधीक्षकपदी नागपूर शहरातील सहाय्यक पोलिस आयुक्त केदार प्रकाश बारबोले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य शासनाच्या गृह विभागाने याबाबतचे अधिकृत आदेश जारी केले असून कार्यासन अधिकारी मृणाल कृष्णा सावंत यांनी बदलीचे निर्देश दिले आहेत.

मूळचे सोलापूर जिल्ह्यातील असलेले केदार बारबोले यांनी यापूर्वी २०२४ मध्ये जळगाव जिल्ह्यातील अमळनेर पोलिस ठाण्यात प्रोबेशनरी अधिकारी म्हणून काम केले आहे. त्यामुळे त्यांना जळगाव जिल्ह्याची भौगोलिक व प्रशासकीय परिस्थिती चांगल्या प्रकारे परिचित आहे.
केदार बारबोले हे २०२३ च्या राज्य सेवा बॅचचे अधिकारी असून त्यांनी एमपीएससी परीक्षा राज्यातून सहाव्या क्रमांकाने उत्तीर्ण केली आहे. शांत स्वभाव, शिस्तप्रिय वृत्ती आणि कार्यतत्परता यासाठी त्यांची ओळख आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे भुसावळ उपविभागातील कायदा व सुव्यवस्थेला अधिक बळकटी मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, सध्याचे पोलिस उपअधीक्षक संदीप गावीत यांची अपर पोलिस अधीक्षक किंवा सहाय्यक पोलिस अधीक्षकपदी पदोन्नतीसह बदली होण्याची शक्यता आहे. त्यांच्या बदलीचे आदेश येत्या दोन दिवसांत जारी होण्याची अपेक्षा आहे. गावीत यांनी ३१ जुलै २०२५ रोजी भुसावळमध्ये पदभार स्वीकारला होता.
याआधी भुसावळचे पोलिस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांची पुणे अमली पदार्थ विरोधी विभागात बढतीसह बदली झाली होती. केदार बारबोले यांच्या नियुक्तीमुळे भुसावळ पोलिस दलात एक नवीन, दबंग आणि कार्यक्षम अधिकारी आल्याचे बोलले जात आहे.


