नागपूरमध्ये १३ डिसेंबरला अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन

भुसावळ (प्रतिनिधी ) – महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली राज्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्याकडून त्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी येत्या १३ डिसेंबर २०२५ रोजी नागपूर येथे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. हे आंदोलन यशवंत स्टेडियम, धनतोली येथे सकाळी ११ वाजता होणार असून हिवाळी अधिवेशनादरम्यान सरकारचे लक्ष वेधण्याचा समितीचा उद्देश आहे.

समन्वय समितीने प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार, शासनाकडे वर्षानुवर्षे पाठपुरावा करूनही अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मूलभूत आणि कायदेशीर हक्कांशी संबंधित मागण्या अद्याप प्रलंबित आहेत. त्यामुळे राज्यभरातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने नागपुरात धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.

समितीच्या प्रमुख मागण्या

  • अंगणवाडी सेविका व मदतनीसांना शासकीय कर्मचारी दर्जा देऊन नियमित वेतन व भत्ते लागू करावेत.
  • केंद्र सरकारने महागाईचा विचार करून मानधनात भरीव वाढ करावी.
  • कामावर आधारित प्रोत्साहनभत्ता रद्द करून दरमहा सरसकट मानधन वाढ लागू करावी.
  • सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ग्रॅच्युटी लागू करावी.
  • सेवेनंतर पेन्शनची व्यवस्था करावी.
  • प्रणालीतील तांत्रिक अडचणी तातडीने दूर कराव्यात.
  • मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा थकित मोबदला त्वरित देण्यात यावा.
  • पंधरा दिवसांऐवजी एक महिना उन्हाळी सुट्टी देण्यात यावी.

या मागण्यांसह इतर प्रलंबित विषयांवरही शासनाने तातडीने आणि सकारात्मक निर्णय घ्यावा, असे आवाहन समितीचे निमंत्रक युवराज बैसाणे, संजय मापले, जयश्री वाबळे, रामकृष्ण बी. पाटील, पूनम निंबाळकर, गोवर्धन मिसाळ, रेखा चव्हाण, चंदा नवले, सत्यभामा रंगारी आणि राजू पाटील यांनी केले आहे.

समितीने सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मोठ्या संख्येने उपस्थित राहून हे आंदोलन यशस्वी करण्याचे आवाहन केले आहे.