भुसावळ (प्रतिनिधी) – भुसावळ पालिकेतील निवडणूक आखाड्यात नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत आठ उमेदवार रिंगणात असून प्रमुख लढत प्रमुख पक्षांमध्ये रंगणार असल्याचे चित्र आहे. बुधवार, 26 रोजी निवडणूकीच्या रिंगणात असलेल्या आठ नगराध्यक्ष पदाचे उमेदवार व 240 नगरसेवक पदाचे उमेदवारांना यांना निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पाटील यांनी चिन्हे वाटप केली. उमेदवारांना चिन्ह व अनुक्रमांकाचे वाटप केल्याने खर्या अर्थाने आता निवडणूक आखाडयाला रंगत आली आहे.

असे आहेत नगराध्यक्ष रिंगणातील उमेदवार
रजनी संजय सावकारे (भाजपा), गायत्री चेतन भंगाळे (गौर) (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार गट), अन्सारी अर्शिया मुक्तार (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजित पवार गट), सविता प्रवीण सुरवाडे (राष्ट्रीय काँग्रेस पार्टी), किर्ती सुरेश वानखेडे (बहुजन समाज पार्टी), समशेर ज्योती प्रकाश (अपक्ष), अलका रामा सुरवाडे (निंबाळकर) (अपक्ष), पुष्पा जगन सोनवणे (अपक्ष )
तसेच 47 नगरसेवक पदासाठी 240 उमेदवार रिंगणात असून यात पाच राष्ट्रीय पक्ष, 5 राज्यातील नोंदणीकृत मान्यता प्राप्त पक्ष व 9 अन्य राज्यातील नोंदणीकृत पक्ष यांना त्यांचे चिन्हे दिली तर 194 प्रकारचे मुक्त चिन्हांचे वाटप करण्यात आले. सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत म्हणजेच चार तास ही प्रक्रीया सुरू होती. राजकीय पक्षाांचे बहुसंख्य उमेदवार हे चिन्हे घेण्याच्या ठिकाणी उपस्थित नव्हते तर काही जणांचे प्रतिनिधी उपस्थित होते. मतदान पत्रिकेवरील अनुक्रमांक पाहाण्यासाठी उमेदवार व त्याच्या प्रतिनिधींनी रात्री उशिरापर्यंत प्रांत कार्यालयात गर्दी केली.
चार तासात चिन्ह वाटप प्रक्रिया
पालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून बुधवारी उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात आले. ही प्रक्रिया सकाळी 11 वाजेपासून सुरू झाली. ती दुपारी तीन वाजेपर्यत सुरू होती. यामुळे प्रांताधिकारी कार्यालयात उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींनी गर्दी केली. प्रत्येक प्रभागासाठी स्वतंत्र चिन्ह वाटप निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या दालनात करण्यात आली. दुपारी तीनपर्यंत चिन्ह वाटप झाल्यावर उमेदवारांना त्यांना मिळालेला अनुक्रमांक पाहायचा होता. त्यामुळे दुपारी तीन वाजेनंतर प्रांताधिकारी कार्यालयातील फलकावर उमेदवारांच्या याद्या व त्यांचे अनुक्रमांक पाहाण्यासाठी उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधी यांनी गर्दी केली होती. निवडणूक कार्यालयातून आलेली यादी फलकावर लावल्यावर ही यादी पाहण्यासाठी गर्दी होती. संध्याकाळी 7.30 पर्यत याद्या पहाण्यासाठी गर्दी झाली.
नगराध्यक्ष पदाचे चार उमेदवार हजर
निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात चिन्ह घेण्यासाठी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार उपस्थित होत्या. चार महिला उमेदवार यांनी प्रत्यक्ष चिन्ह वाटपच्या ठिकाणी थांबून प्रक्रियेत सहभाग घेतला. त्यांनी त्यांचे चिन्ह घेतले. यावेळी प्रांत चेंबरच्या बाहेर उमेदवारांना चिन्ह दिले जात होते. तेथे एक पथक उमेदवारांना मिळालेले चिन्हाचे वितरण करीत होत
मतदान यंत्रे लावली क्रमांकानुसार
तहसील कार्यालयाच्या गोदामातील स्ट्राँग रूममध्ये ठेवण्यात आलेले मतदान यंत्रे बुधवारी काढून ते पुन्हा त्याच हॉलमध्ये क्रमांकानुसार लावण्यात आली. शुक्रवारी मशीन सिलिंग करण्याची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. यासाठी स्वतंत्र पथक नियुक्त केले आहे. त्या पथकाच्या माध्यमातून मतदान यंत्रे सिलिंग केली जातील. गोदामात आखणी करून तेथे पुन्हा मशीन ठेवण्यात आल्या आहे. मतदान यंत्रात लावण्यासाठी मतपत्रिका तयार केली जात आहे. मतपत्रिका तयार झाल्यावर ती सुध्दा मशीनमध्ये फिक्स केली जाणार आहे.
तीन बटने दाबावी लागणार
मतदारांना मतदान करतांना नगराध्यक्षपदासाठी एक व एका प्रभागातून दोन नगरसेवक निवडून द्यायचे असल्याने तेथे दोन मते अशी तीन मते दिल्या शिवाय मतदानाची प्रक्रिया पूर्ण होणार नाही, जर मतदारांनी एक अथवा दोन बटने दाबली तर त्या मतदारांचे मतदान पूर्ण होणार नाही, तीन बटने दाबल्यावरच बीफ असा आवाज येणार आहे त्यामुळे मतदारांना तीन बटने दाबणे आवश्यक आहे, नगराध्यक्ष पदासाठी एक मशीन स्वतंत्र असेल तर नगरसेवकांसाठी एक मशीन असेल.


