माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे, अनिल चौधरी पहिल्यांदा भिडले : भुसावळ पालिका निवडणूक : शाब्दिक युद्धात एकमेकांना म्हटले भाजपची ‘बी टीम’ :

भुसावळ (उज्वला बागुल) : भुसावळ नगरपालिका निवडणूक आता खऱ्या अर्थाने रंजक वळणावर येऊन ठेपली आहे. कारण आरोप-प्रत्यारोपांचा फुकटचा तमाशाचा फड रंगला आहे. ‘कधी काळी उमेश नेमाडे व अनिल चौधरी ही गोड जोडी इथल्या राजकारणात प्रसिद्ध होती. ती घट्ट मैत्री म्हणून. पण आता त्यात राजकीय वितुष्ट आले आहे. कारण ठरले आहे भुसावळ पालिका निवडणूक.

खडसे म्हणाले जिल्ह्यात भाजपची ‘लाडकी बायको योजना

पालिका निवडणूक भाजप मंत्री संजय सावकारेंच्या, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडेंच्या, राष्ट्रवादी शरद पवार गट माजी आमदार संतोष चौधरी यांच्या नेतृत्वाखाली लढत आहे. भाजपने मंत्री सावकारे यांच्या पत्नी रजनी सावकारे यांना उमेदवारी दिली. याच कारणाने त्यांच्यावर घराणेशाहीचा आरोप होतो आहे. आमदार एकनाथ खडसे यांनी तर ‘जळगाव जिल्ह्यात लाडकी बायको योजना भाजपने आणली आहे.’ असा आरोप केला आहे. यात त्यांचा सर्वाधिक रोष सावकारेंवर होता हे अधोरेखित होते आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने सामाजिक व धार्मिक समीकरण समोर ठेवून मुस्लिम कुटुंबातील सून असलेल्या अनुसूचित जाती प्रवर्गातील ‘लाडकी बहिण’ उमेदवार दिली आहे. त्यामुळे चौधरी बंधूंची मदार असलेला मुस्लिम मतदार राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे अधिक झुकू शकतो. किंबहुना तसे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे नेमाडे यांनी चौधरी बंधू यांच्यासमोर आव्हान उभं केलं आहे. हे करताना नेमाडे हे थेट मंत्री सावकारे दुखावणार नाही याची काळजी घेताहेत. नेमकं हेच चौधरींना खटकते आहे. त्यातूनच अनिल चौधरी यांनी नेमाडे यांना निशाण्यावर ठेवलं असल्याचे जाणवते आहे.

उमेश नेमाडे भाजपची ‘बी टीम’ : अनिल चौधरी

‘भाजपला फायदा व्हावा यासाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेश नेमाडे यांनी सोयीचे उमेदवार दिले आहेत. त्यांना आर्थिक रसद भाजप पुरवतो आहे. त्यांचे आव्हान अजिबात वाटत नाही. मतदार त्यांना योग्य जागा दाखवतील.’ असा आरोप माजी प्रभारी नगराध्यक्ष अनिल चौधरी यांनी नेमाडेंवर केला आहे. काॅंग्रेसला दोन जागा देणार होतो पण ते दहा जागा मागत होते. म्हणून बोलणी फिस्कटली. असे त्यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले आहे.

दोन दिग्गज उमेदवारांनी माघार कशी घेतली? : नेमाडे

भुसावळ पालिका निवडणुकीत भाजपचे उमेदवार निर्मल कोठारी व महिमा अजय नागरानी हे दोघं बिनविरोध निवडून आले आहेत. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटाने चौधरी बंधूंचा शब्द ‘शिरसावंद्य’ मानणारे अशोक चौधरी व पुष्पा कैलास चौधरी यांना उमेदवारी दिली होती. मात्र दोघांनी शेवटच्या क्षणी माघार घेतली. त्यामुळे भाजपचे दोन्ही उमेदवार बिनविरोध झाले. मात्र जनता दुधखुळी नाही. कोण कसं मॅनेज झाले हे लोकांना कळले आहे. ‘भाजपचे हे दोन्ही उमेदवार कसे बिनविरोध झाले हे चौधरी यांनी स्पष्ट करावे मग आपल्यावर आरोप करावे. आरोप करणारी व्यक्ती पारदर्शी असली तर त्यांच्या वक्तव्याला अर्थ असतो’ अशा शब्दांत नेमाडे यांनी अनिल चौधरी यांना फटकारले आहे.