. अमळनेर (प्रतिनिधी) : शेतातील मका काढताना मशिनीत रुमाल अडकल्याने तरुणाला फास लागून त्याचा मृत्यू झाला. अमळनेर तालुक्यातील पातोंडा येथे शुक्रवारी सकाळी ही घटना घडली. नितीन सुरेश बिरारी (36) असे मृताचे नाव आहे.
नितीन बिरारी हा सकाळी शेतात कोळपणीसाठी तयारीनिशी जात होता मात कोळपणीसाठी जात असतानाच वाटेतच मका काढणी यंत्र व ट्रॅक्टर दिसल्याने कोळपणीचे काम सोडून आधी मका धान्य काढून घेऊ असा निश्चय करून तो शेतात गेला.

शेतात गेल्यावर मका काढणीसाठी सर्व तयारी केल्यानंतर मशीन सुरू झाले. मका निघत असताना मका मशीनमध्ये साचत आहे की काय हे बघण्यासाठी खाली वाकून पाहत असताना गळ्यात असलेला रुमाल अचानक हवेच्या दाबाने मशीन यंत्राच्या पंख्याला ओढला गेला. रुमाल ओढला गेल्याच त्याला गळ्याला जोराचा फास लागला.
हा प्रकार लक्षात आल्याने तरुणाला तातडीने अमळनेर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले. शनिवारी सकाळी त्याची प्राणज्योत मालवली. तरुणाच्या दुर्दैवी मृत्यूमुळे तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात आली.


