छत्रपती संभाजीनगर : स्पर्धा परीक्षेची तयारी करताना ओळख झालेल्या तरुणीवर प्रशिक्षणार्थी पोलिस उपनिरीक्षकाने अत्याचार केला शिवाय पीडीता गर्भवती राहिल्यानंतर खाजगी फोटो व्हायरल करण्याची धमकी देत गर्भपात घडवून आणण्यात आला. या प्रकरणी पीडीतेच्या फिर्यादीवरून क्रांती चौक पोलिसांनी आरोपी भागवत ज्ञानोबा मुलगीर विरोधात अत्याचार व अॅट्रासिटी अंतर्गत गुन्हा दाखल केला तसेच संशयीताचे वडील, बहीण यांच्यावरही सहआरोपी म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला.
पीडित महिला आणि आरोपी भागवत ज्ञानोबा मुलगीर हे दोघेही परभणी जिल्ह्यातील आहेत. शहरात स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी दोघे आल्यानंतर ओळख होवून प्रेम निर्माण झाले. आरोपीने 2024 च्या फेब्रुवारीत तिला अजबनगर परिसरातील एमएच-20 नावाच्या कॅफेत नेले आणि तिथे तिच्यावर शारीरिक संबंधांसाठी दबाव टाकत अत्याचार केला.

या संबंधातून पीडिता गर्भवती राहिली. संशयीताने तिचे आणि त्याचे खाजगी फोटो व्हायरल करण्याची भीती दाखवत तिला जबरदस्ती गर्भपाताच्या गोळ्या घेण्यास भाग पाडले. गोळ्यांमुळे गर्भपात झाल्यानंतर आरोपीने पीडितेला पूर्णपणे दूर केले आणि तिला ब्लॉकही केले. त्याचदरम्यान आरोपी फौजदारपदाची परीक्षा उत्तीर्ण झाला.
प्रकरण उघड केल्यानंतर पीडित महिलेने आरोपीच्या वडिलांशी आणि बहिणीशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनीही तुला जे करायचे ते कर असे म्हणत धमकावल्याचा आरोप पीडीतेने केला आहे. अखेर मानसिक छळ, धमक्या आणि झालेल्या अत्याचारामुळे पीडित महिला क्रांती चौक पोलीस ठाण्यात पोहोचली.
तक्रार मिळताच सहाय्यक पोलीस आयुक्त सागर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी एमएच-20 कॅफेत घटनास्थळाचा पंचनामा केला.


