
भुसावळ । उज्वला बागुल
जळगाव जिल्ह्यात भुसावळ ही खान्देशातील एकमेव ‘अ’ वर्ग नगरपालिका आहे. ती आपल्या ताब्यात रहावी म्हणून सर्वंच राजकीय पक्ष इथे जोर लावतात. भाजपचे राज्याचे विद्यमान केबिनेट मंत्री संजय सावकारे व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी आमदार संतोष चौधरी हे दोघे बडे नेते इथले आहेत. सावकारे हे कधी काळी चौधरी यांचे पीए किंबहुना शिष्य होते. त्यांनीच त्यांचा राजकीय ‘अभ्यूदय’ केला. ठेवणीतले डाव शिकवले. कालांतराने मात्र सावकारेंनी हेच डाव चौधरींवर टाकून आपली राजकीय रेषा मोठी केली आहे. त्याचे प्रत्यंतर भुसावळ पालिका निवडणुकीत येते आहे. इथं यंदा तिरंगी लढत झाली तर त्याचा फायदा शंभर टक्के भाजपलाच होऊ शकतो असा ‘लोककयास’ आहे.

मंत्री सावकारेंचे बहूचर्चित स्टेटस
भुसावळ नगराध्यक्ष पदासाठी भाजप मंत्री संजय सावकारे यांच्या पत्नी रजनी सावकारे यांनाच उमेदवारी देईल ही ‘काळ्या दगडावरची पांढरी रेघ’ आहे. कारण इथले उमेदवार ठरवण्याचे सर्वाधिकार त्यांनाच आहेत. अर्थात, ‘राजयोगा’ने पुरेपूर भरलेल्या ताटाला ते पाठ करतील याची सूतराम शक्यता नाही. तसं नसतं तर नगराध्यक्ष पदाचं आरक्षण जाहीर होताच त्यांनी समाज माध्यमांवर आपल्या सौभाग्यवतीला नगराध्यक्ष पदाच्या अँडव्हान्स शुभेच्छा देणारे स्टेटस ठेवलं नसतं. भाजपत राजकीय कुजबुज व ‘बेरक्यां’ची वळवळ सुरू झाल्यावर त्यांनी हे सूचक स्टेटस डिलिट केले हा भाग अलाहिदा. पण जो संदेश द्यायचा तो पोहोचवण्यात यशस्वी ठरले हे कुणी नाकारू शकत नाही.
आंबेडकरी चळवळीचा एल्गार
भुसावळ येथील नगराध्यक्ष पद अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव आहे. इथले आमदारही भाजपचे आहेत. त्यांच्याकडे गेल्या ३५ वर्षांपासून भाजपचे काम करणारे बुद्धीस्ट कार्यकर्ते आहेत. मात्र या पदासाठी एकाचाही विचार होत नसल्याचे चित्र आहे. महाविकास आघाडीने देखील लेवा घराण्यातील सून असलेल्या दलित लेकीला नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देण्याचे घोषित केले आहे. त्यामुळे आंबेडकरी चळवळीने स्वतंत्र उमेदवार देण्याची तयारी सुरू केली आहे. समजा असे झाले तर तिरंगी लढत होईल. पण त्यातून दलित मतांच्या विभागणीचा फायदा विधानसभा सारखा आपसूक भाजपला होईल हे त्रिकालाबाधित सत्य आहे. तसं होऊ नये म्हणून माजी आमदार संतोष चौधरी यांची एक टिम प्रहारचे नेते अनिल चौधरी यांच्या नेतृत्वाखाली कामाला लागली असल्याचे जाणकार सांगतात.
आंबेडकरी चळवळीची बैठक चर्चेत
भुसावळात आंबेडकरी चळवळ जिवंत ठेवण्यासाठी काम करणाऱ्या सर्व संस्था, संघटना, राजकीय पक्षात काम करणारे दलित कार्यकर्ते यांची एक बैठक बुद्धविहारात नुकतीच झाली. शेकडो कार्यकर्ते व नेते त्यात सहभागी होते. त्यात माजी नगरसेवक राजू सूर्यवंशी यांच्या पत्नीला उमेदवारी देण्याचा एकमुखी ठराव झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे चुरस आणखी वाढेल असे चित्र आहे. मात्र, भीम आर्मीचे नेते जगनभाई सोनवणे यांनीही गेल्या आठवड्यात त्यांच्या पत्नी पुष्पा सोनवणे यांची उमेदवारी लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी जाहीर केली आहे. त्यामुळे आंबेडकरी चळवळीतील उमेदवार एक असतो की दोन ही उत्सुकता वाढली आहे.


