भुसावळ (उज्वला बागुल) : पालिका निवडणुकीची घाेषणा हाेताच भुसावळचे राजकीय मैदान अपेक्षेनुसार तापले आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी आमदार संताेष चाैधरी आणि कधी काळी त्यांचे शिष्य व स्वीय सहाय्यक राहून चुकलेले विद्यमान मंत्री संजय सावकारे यांच्यात विळा-भाेपळ्याचे सख्य आहे. वर्तमान परिस्थितीचा धांडाेळा घेतला असता आता तर दाेघेही एकमेकांना पाण्यात पाहताहेत. भुसावळचे नगराध्यक्षपद अनुसूचित जातीसाठी राखीव निघाले आहे. मात्र, हा सर्व प्रकार मॅनेज आहे अशा आशयाची टीका माजी आमदार संताेष चाैधरी यांनी केली हाेती. या संदर्भात माध्यमांनी छेडले असता मत्री संजय सावकारेंनी ‘संताेष चाैधरींच्या मुर्खपणावर हसावं की रडावं’ अशा आशयाची प्रतिक्रिया नाेंदवली हाेती. त्यावर पुन्हा चाैधरींनी ‘सावकारेंना पैशांची घमेंड चढली आहे. जनता भल्याभल्यांना वठणीवर आणते. ज्यांनी राजकारणात बाेट धरून आणले त्यांना हे महाशय राजकारण शिकवताहेत.’ असं जशास तसे उत्तर दिले आहे. त्यामुळे पुढचे दाेन ते तीन आठवडे भुसावळकरांना आराेप-प्रत्याराेपांच्या फैरी झडताना पहायला मिळतील.

सत्ताधीश कुणीही असाे चर्चा अनिल चाैधरींचीच
भुसावळात सत्ता कुणाचीही असाे. चर्चा मात्र, इथल्या राजकारणातले अलिखित बाहुबली (ताकदवान नेता)अशी ओळख असलेले माजी प्रभारी नगराध्यक्ष अनिल छबिलदास चाैधरी यांचीच हाेते. गेल्या दहा वर्षांपासून त्यांनी भुसावळ शहरात फारसे लक्ष घातलेले नाही. आमदारकीचा टीळा माथी लागावा म्हणून त्यांनी आपला मुक्काम यावल-रावेर मतदारसंघात हलवला हाेता. मात्र, त्यात त्यांना दाेन्ही टर्मला यश मिळाले नाही. मागच्या वेळी ते यशाच्या जवळ पाेहाेचले असताना त्यांना हुलकावणी मिळाली हाेती. नुकत्याच झालेल्या विधानसभेत त्यांना पराभवाचे ताेंड पहावे लागले. तेव्हापासून त्यांनी यावल-रावेरकडे पाठ फिरवली आहे. किंबहुना, ते आता पुन्हा भुसावळात सक्रीय हाेण्याचे संकेत मिळताहेत. मात्र, असे असले तरी त्यानी अजुनपर्यंत आपल्या प्रहार जनशक्ती पक्षाची भूमिका जाहीर केलेली नाही. त्यामुळे प्रस्थापित राजकारणीही बुचकळ्यात पडले आहेत.
सावकारेंच्या घरातील उमेदवार नकाेच
भुसावळची नगराध्यक्ष निवड बिनविराेध करण्यासाठी तयार आहे. चिठ्ठ्या टाकून मागासवर्गीय उमेदवाराला संधी देण्याची हिंमत दाखवा असे आव्हान चाैधरी यांनी मंत्री संजय सावकारेंना माध्यमांशी बाेलताना दिले आहे. मात्र, हे सांगताना त्यानी सावकारेंच्या घरातील उमेदवार लाेकांनाही नकाेच आहे असेही नमूद केले. त्यामुळे वातावरण आणखीन तापण्याचे संकेत मिळताहेत. कधी नव्हे अशी ही निवडणूक चाैधरी यांनी अंगावर घेतल्याचे गेल्या आठवडाभरातील घडामाेडींवरून दिसून येते आहे. दुखावलेले व दुरावलेले जुन्या कार्यकर्त्यांनाही अनिल चाैधरींच्या माध्यमातून जवळ करण्याचा प्रयत्न आगामी चार दिवसांत संताेष चाैधरी हे करू शकतात. सावकारेंना ज्या भागातून रसद पुरवली जाते त्या भागात शक्यताेवर आपल्या घरातील किंवा अधिक जवळचा उमेदवार देण्याची खेळी चाैधरींकडून खेळली जाते आहे. राजेंद्र आवटे, युवराज लाेणारी, राजेंद्र नाटकर यांचे प्रभाग त्यांच्या रडारवर आहेत.
विधानसभा, लाेकसभेची आकडेमाेड
लाेकसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवार रक्षा खडसे यांना जितका लिड भुसावळ विधानसभा मतदारसंघात मिळाला हाेता, त्याच्या दुप्पटचा लिड याच पक्षाचे संजय सावकारे यांना मिळाला हाेता. मात्र, दाेन्ही निवडणुकांत केवळ तीन ते चार महिन्यांचे अंतर हाेते. असे असताना रक्षा खडसेंपेक्षा सावकारेंना लिड अधिक कसा मिळाला हाेता? याचे गणित खडसे समर्थक कार्यकर्ते मांडताना दिसताहेत. याचाच अर्थ, सावकारे समर्थकांनी लाेकसभेला पुरेसे भाजपचे काम केलेले नव्हते असा अंदाज लावला जाताे आहे. याच विषयाचे भांडवल करून सावकारेंच्या अडचणी वाढवण्यासाठी भाजपचा एक छुपा गट काम करीत असल्याचे जाणकारांकडून सांगण्यात येते आहे.
चाैधरी अनुभवातून झाले शहाणे
भुसावळ पालिकेच्या मागच्या निवडणुकीत संताेष चाैधरी यांचे सुपूत्र सचिन चाैधरी यांचा थाेडक्यात पराभव झाला हाेता. त्याचे कारण म्हणजे चाैधरींनी उशिरा सुरू केलेले काम, प्रचारात नसलेली सुत्रबद्धता, कार्यकर्त्यात बेबनवाव ही त्या मागची कारणे हाेती. मात्र, या वेळी ही चूक हाेऊ नये म्हणून त्यांनी महिनाभरापासून निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. त्यातल्या त्यात ८० टक्के तरुण उमेदवार देण्याची घाेषणा केल्याने युवकाचा ओढा त्यांच्याकडे वाढला आहे. कुठल्याही परिस्थितीत प्रस्थापित नगरसेवकांना घरचा रस्ता दाखवण्याचा चंग त्यांनी बांधला आहे. त्यात त्यांना आता यश येत असल्याचा माहाेल तयार हाेऊ लागला आहे.


