भुसावळ पालिका निवडणूक : प्रशासकीय यंत्रणा सज्ज : एक लाख 78 हजार 780 मतदार बजावणार हक्क : एकूण 191 मतदान केंद्रे : 1200 कर्मचारी नियुक्त : प्रांताधिकार्‍यांनी दिली माहिती

भुसावळ (प्रतिनिधी) – भुसावळ पालिका निवडणुकीसाठी प्रशासन गतिमान झाले असून प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे . शहरात 2 डिसेंबर रोजी होत असलेल्या निवडणुकीत एकूण 191 मतदान केंद्रावर एक लाख 78 हजार 780 मतदार हक्क बजावणार असून प्रत्येक मतदान केंद्रावर 800 ते 1 हजार मतदार जोडले गेले आहेत , निवडणुकीसाठी एक हजार 200 कर्मचारी नियुक्त करण्यात आले असल्याची माहिती प्रांताधिकारी व निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पाटील यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.यावेळी नायब तहसीलदार संतोष विनंते उपस्थित होते .

प्रशासकीय यंत्रणा सज्ज
प्रांत जितेंद्र पाटील म्हणाले की, सोमवार, 10 पासून पालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केले जातील. त्यादृष्टीने तयारी पूर्ण झाली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर शहराच्या चारही मार्गांवर स्थिर सर्वेक्षण पथक नियुक्त असून शहरात येणार्‍या-जाणार्‍या वाहनांची तपासणी त्या पथकांद्वारे केली जाईल. यात यावल नाका, जळगाव रोड वाय पॉइंट, जामनेर रोड डीवायएसपी कार्यालयाजवळ आणि वरणगाव रोडवरील सुंदरनगर जवळ ही पथके राहतील. यात भरारी व व्हिडीओ पथकही असेल. स्वतंत्र आचारसंहिता कक्ष असेल .
तहसीलमधून होणार साहित्याचेे वाटप
निवडणुकीसाठी मतदान साहित्यांचे वाटप हे तहसील कार्यालयातून केले जाणार आहे तसेच मतदान साहित्य सुद्धा मतदान पूर्ण झाल्यावर तेथेच स्वीकारले जाणार आहे. मतदानाच्या दुसर्‍या दिवशी तहसील कार्यालयाच्या आवारातच मतमोजणी होणार असून त्याचे नियोजन केले जात आहे. मतपत्रिका व स्टेशनरी ही स्थानिक स्तरावरूनच घेतली जाणार आहे, असेही सांगितले. विशेष महत्वाची सूचना म्हणजे जे उमेदवार अर्ज दाखल करतील त्यांचे जातीचे प्रमाणपत्र हे महाराष्ट्र राज्यातीलच असावे. अन्य राज्यातील प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाणार नाही. उमेदवारांनी अर्ज दाखल करण्यापूर्वी ऑनलाईन अर्ज दाखल करावा, नंतर निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे अर्ज सादर करता येणार आहे. जात प्रमाणपत्र हे पडताळणीसाठी दिले असल्याचे टोकन सादर करावे आणि मूळ प्रमाणपत्र हे सहा महिन्यांत सादर करावे.
मतदान अधिकारी, कर्मचारी असे पालिका निवडणुकीसाठी मनुष्यबळ उपलब्ध केले आहे. यात 1200 कर्मचारी असतील. त्यात 191 केंद्राध्यक्ष, तीन पोलिंग ऑफिसर, 191 पोलिस, 191 शिपाई नियुक्त केले आहे. त्या सर्वांना त्यांच्या कामाचे स्वरूप सांगण्यात आले आहे. सोमवार दि. 10 पासून ही यंत्रणा कामाला लागणार आहे.

100 टक्के मतदान केंद्रे होणार ब्रॉडकॉस्टिंग
शहरातील 191 मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. त्या सर्व मतदान केंद्रांना बॉडक्रॉस्टींगने जोडले जाणार आहे. यामुळे निवडणूक प्रमुख सुद्धा त्याच्या कार्यालयातून कुठल्या मतदान केंद्रावर काय सुरू आहे, याचा तेथे बसून आढावा घेऊ शकणार आहे. त्या दृष्टीने नियोजन केले आहे. तसेच व्हीडीओ चित्रीकरण देखील केले जाणार आहे. बी एल ओ, आशा वर्कर , अंगणवाडी सेविका , एन एस एस , एन सी सी स्काऊट गाईड विद्यार्थी वृद्ध , दिव्यांग , जेष्ठ नागरिक , यांना मदत करतील .

अधिकारी, कर्मचारी यांना दिल्या सूचना
प्रांताधिकारी कार्यालयात शुक्रवारी निवडणुकीशी संबंधित कर्मचारी, अधिकारी यांच्या बैठकीचे आयोजन केले होते. त्यात विविध कक्ष प्रमुख व त्यांचे सहकारी कर्मचारी यांची नियुक्ती केली. सर्वांनी सोमवारपासून निवडणुकीच्या कामाला लागायचे, अशा सूचना केल्या. काही नवीन कर्मचारीही घेण्याच्या सूचना केल्यात. आज राजकीय प्रमुखांची बैठक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शनिवार 8 नोव्हेंबर रोजी 11 वाजता प्रांताधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे त्यामध्ये पक्ष प्रमुखांना विशेष सूचना देण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक अधिकारी जितेंद्र पाटील यांनी दिली .