भुसावळात घरफोडी ; रेल्वे अधिकार्‍याचे घरातून 50 हजारांच्या रोकडसह दागिने लंपास –

भुसावळ (प्रतिनिधी) : शहरातील ताप्ती क्लब रेल्वे ऑफिसर्स कॉलनी परिसरात घरफोडी झालयने खळबळ उडाली. रेल्वेचे वरिष्ठ विधी अधिकारी विकास सुमेरसिंग धुर्वे यांच्या राहत्या घरात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून रोकड व सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण 50 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला. शहर पोलिसात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

बंद घराला टार्गेट
शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वे अधिकारी विकास धुर्वे हे ताप्ती क्लब रेल्वे ऑफिसर्स कॉलनी येथे राहतात. 25 ऑक्टोबर रोजी रात्री 11 वाजता ते गावाला गेले असता 2 नोव्हेंबर रोजी पहाटे 4 वाजेपर्यंत दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे मुख्य गेट व कपाटाचे लॉक तोडून घरातील सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड असा ऐवज चोरून नेला.

चोरट्यांनी घरातून सहा ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या अंगठ्या, 100 ग्रॅम चांदीच्या पायल, 50 ग्रॅम चांदीच्या पायातील पैजण, अंगठ्या आणि 500 रुपयांच्या नोटांमध्ये 25 हजारांची रोकड असा एकूण 50 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल चोरला. या प्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास शहर पोलिस निरीक्षक उध्दव डमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल भंडारे करीत आहेत.