भुसावळातील शिवम इलेक्ट्रीकल्समध्ये लाखोंची धाडसी चोरी ; मंत्री संजय सावकारे यांनी केली पाहणी :

भुसावळ (प्रतिनिधी) : शहरातील मुख्य बाजारपेठेतील शिवम इलेक्ट्रीकल्स रविवारी मध्यरात्री चोरट्यांनी दुकानाचे शटर वाकवत गल्ल्यातून सुमारे चार ते पाच लाखांची रोकड लांबवली. सकाळी हा प्रकार समोर आल्यानंतर शहरातील व्यापारी वर्गात मोठी खळबळ उडाली. दुकान मालक राजेश बलराम तलरेजा यांनी बाजारपेठ पोलिसात या प्रकरणी तक्रार दिली आहे
शहरातील बाजारपेठेत राजेश तलरेजा यांचे शिवम इलेक्ट्रीकल्स हे दुकान आहे. रविवारी मध्यरात्रीनंतर चोरट्यांनी संधी साधत दुकानाचे शटर वाकवून दुकान प्रवेश मिळवला व गल्ल्यातील सुमारे चार ते पाच लाखांची रोकड लांबवली.

बाजारपेठ पोलिसांनी धाव घेत पाहणी केली तसेच सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध घेतला जात आहे.

कापड दुकानातही चोरीचा प्रयत्न
कजरी साडीचे किरण महाजन यांच्या दुकानातही चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला मात्र या दुकानातून काहीही चोरीला गेले नसल्याचे सांगण्यात आले.

मंत्री संजय सावकारे यांनी केली पाहणी
चोरीच्या प्रकारानंतर मंत्री संजय सावकारे यांनी भेट देत पाहणी केली. यावेळी पोलिस उपअधीक्षक संदीप गावीत, बाजारपेठ पोलिस निरीक्षक राहुल वाघ व सहकारी उपस्थित होते. शहरातील बाजारपेठेत गस्त वाढवून चोरट्यांचा बंदोबस्त करावा तसेच व्यापार्‍यांना भयमुक्त करावे, अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या.