मध्यरात्री पिस्तूल व तलवारींसह रस्तालूट व दरोड्याची तयारी करणारे सात आरोपी जेरबंद ; चोपडा शहरातील घटना ;

चोपडा,( प्रतिनिधी ) : चोपडा शहरातील शिरपूर बायपास रोडवर मध्यरात्री 02:30 वाजेच्या सुमारास प्राणघातक शस्त्रांसह रस्तालूट आणि दरोड्याची तयारी करणाऱ्या सात धोकादायक गुन्हेगारांना चोपडा शहर पोलिसांनी जेरबंद केले आहे. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने तात्काळ कारवाई करत या आरोपींना ताब्यात घेतले. याप्रकरणी पोलिसांनी गावठी पिस्तूल, तलवारी, मोबाइल फोन, रोख रक्कम आणि स्विफ्ट डिझायर कार (MH 26 CH 1733) असा एकूण 13,10,000/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, शिरपूर बायपास रोडवरील रणगाडा चौकाजवळ एका पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट डिझायर कारमध्ये सात संशयित थांबलेले असल्याचे समजले. पोलिसांनी तात्काळ पथक तयार करून सदर ठिकाणी छापा टाकला. कारच्या बाहेर दोन संशयित लक्ष ठेवत उभे होते, तर पाच जण कारमध्ये बसलेले आढळले. पोलिसांना पाहताच त्यांनी पळण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलिसांनी घेराव घालून सर्व सात आरोपींना ताब्यात घेतले. तपासणीत दोन आरोपींच्या कंबरेला गावठी पिस्तूल, दोन तलवारी आणि एक रिकामे मॅगझीन आढळले

यावेळी दिलीपसिंग हरीसिंग पवार (वय 32, रा. नाथनगर, नांदेड) , विक्रम बाळासाहेब बोरगे (वय 24, रा. वैजापूर, जि. संभाजीनगर) , अनिकेत बालाजी सूर्यवंशी (वय 25, रा. नवामोंढा, नांदेड) अमनदिपसिंग अवतारसिंग राठोड (वय 25, रा. मगनपुरा, नांदेड)सद्दामहुसेन मोहम्मद अमीन (वय 33, रा. इतवारा मेस्को रोड, नांदेड) अक्षय रविंद्र महाले (वय 30, रा. भावसार गल्ली, चोपडा)
जयेश राजेंद्र महाजन (वय 30, रा. भाटगल्ली, चोपडा) यांना ताब्यात घेतले असता चौकशीत समोर आले की, हे सर्व आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर नांदेड, वैजापूर (जि. संभाजीनगर) आणि चोपडा येथे खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी, दंगल, दहशत माजवणे, तसेच शस्त्रे बाळगणे यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. यापैकी दिलीपसिंग पवार याच्यावर नांदेड येथे भा.दं.वि. कलम 140, 115(2), 351(3), 352, 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल आहे. दोन आरोपी हे महाराष्ट्र धोकादायक कृत्यांना प्रतिबंध अधिनियम (MPDA) अंतर्गत स्थानबद्धतेतून नुकतेच कारागृहातून बाहेर आलेले आहेत, तर एक आरोपी वैजापूर येथील दरोडा आणि आर्म अॅक्टच्या गुन्ह्यात फरार होता. चोपडा येथील एका आरोपीवर यापूर्वी शस्त्रे बाळगणे आणि दंगल यासारखे गुन्हे दाखल आहेत.
आरोपींनी संगनमताने सशस्त्र स्थितीत रस्तालूट आणि दरोड्याची तयारी केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्याविरुद्ध चोपडा शहर पोलिस स्टेशन येथे गु.र.नं. 581/2025 अंतर्गत भा.दं.वि. कलम 310(4), 310(5), शस्त्र अधिनियम 1959 चे कलम 3/25, 4/25, तसेच महाराष्ट्र पोलिस कायदा कलम 37(1)(3) आणि 135 यांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सर्व आरोपींना अटक करून रिमांडसाठी न्यायालयात हजर करण्यात येत आहे.
दरम्यान, या तपासातून समोर आलेलं आहे की, नांदेड येथे या आरोपींची मोठी दहशत आहे. ते शस्त्रांचा धाक दाखवून खंडणी वसूल करणे, खंडणीसाठी अपहरण करणे, लोकांना विवस्त्र करून छळणे आणि त्याचे व्हिडीओ बनवून इतरांना धमकावणे असे गंभीर कृत्य करत असल्याचे उघड झाले आहे. याबाबत सखोल तपास सुरू आहे.
सदरील कारवाई ही जिल्हा पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलिस अधीक्षक कविता नेरकर (चाळीसगाव), उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब घोलप (चोपडा) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक मधुकर साळवे आणि सहाय्यक पोलिस निरीक्षक एकनाथ भिसे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह पार पाडली. यापुढील तपास पोलिस उपनिरीक्षक चेतन परदेशी करत आहेत.