जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या चार कर्मचार्‍यांचे निलंबन –

जळगाव – गुरे चोरीच्या गुन्ह्यातील दोन संशयीत पोलिसांच्या तावडीतून बेड्यांसह पसार झाल्याची घटना अमळनेर तालुक्यात बुधवारी घडली होती. या घटनेत शाकीर शाह अरमान शाह आणि अमजद शेख फकीर कुरेशी हे पसार झाल्यानंतर पोलिस अधीक्षकांनी जळगाव गुन्हे शाखेच्या चार कर्मचार्‍यांन निलंबित केल्याने पोलिस वर्तुळात खळबळ उडाली आहे.
शाकीर शाह अरमान शाह (30, सुप्रीम कॉलनी, जळगाव) आणि अमजद शेख फकीर कुरेशी (35, अशोक किराणाजवळ, मेहरुण, जळगाव) यांना गुरे चोरीच्या प्रकरणात अटक करण्यात आली. संशयीतांना स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी शासकीय वाहनातून अमळनेर येथे बुधवारी नेत असताना कुर्‍हे रेल्वे अंडरपास बोगद्यात वाहन आल्यानंतर मागच्या सीटवर बसलेले हे दोघे आरोपी खाली उतरून पळून गेले. रात्री 11.30 वाजेच्या सुमारास ही घटना घडली होती.

पोलिसांच्या तावडीतून पसार झालेल्या या दोघा आरोपींच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 262 प्रमाणे अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

चार कर्मचार्‍यांचे निलंबन
गुन्हे शाखेतील पोलिसांच्या ताब्यातून आरोपी बेड्यांसह पार झाल्याप्रकरणी शनिवारी हेड कॉन्स्टेबल संदीप पाटील, प्रवीण मांडोळे, हरीलाल पाटील व राहुल कोळी यांना निलंबित करण्यात आले.