पाचोरा (प्रतिनिधी ) – पाचोरा येथील एका गावात माहेरी असलेल्या विवाहीत महिलेसोबत जबरदस्तीने दोन नराधमांनी अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, या प्रकरणी पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात दोघां तरुणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.
प्राप्त माहितीनुसार, पीडित महिला विवाहित असून तिच्या लग्नानंतर काही दिवसांनी तिचे मानसिक संतुलन बिघडले. त्यामुळे ती सध्या आपल्या माहेरी भावाकडे राहत होती. दिनांक 23 ऑक्टोबरच्या सायंकाळी, गावातील दोन तरुणांनी सदर महिलेस दुचाकीवर बसवून नेले. ती मानसिकदृष्ट्या अस्थिर असल्याची माहिती असतानाही, दोघांनी तिच्यावर बळजबरीने अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
सदर घटनेची माहिती गावकऱ्यांना समजताच एकच संतापाची लाट उसळली. त्यानंतर पीडितेच्या भावाला हा सर्व प्रकार समजला. भावाने तत्काळ पिंपळगाव हरेश्वर पोलिस ठाण्यात धाव घेऊन दोन्ही संशयितांविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तत्काळ गुन्हा नोंदवून तपासाची चक्रे वेगाने फिरवून
या प्रकरणी दोन संशयित तरुणांना ताब्यात घेतले . त्या दोघां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची गंभीरता लक्षात घेता पोलिसांकडून पुढील तपास जलद गतीने सुरू आहे. या प्रकारामुळे संपूर्ण परिसरात संताप व्यक्त होत असून, गावकऱ्यांनी संशयीत आरोपींवर लवकरात लवकर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.



