पाचोर्‍यातील महिलेला सव्वातीन लाखांचा गंडा : आरोपी दोन वर्षानंतर जेरबंद: –

पाचोरा (प्रतिनिधी) : शहरातील महिलेच्या बँक खात्यातून तीन लाख 19 हजार 516 रुपये अवैधरित्या काढून घेतल्याप्रकरणी दोन वर्षानंतर आरोपीला नागपूरात पकडण्यात आले.विशाल दीपक गायकवाड (25, रा.फ्लॅट नंबर 702, सातवा मजला, अमर पॅलेस, धंतोली, नागपूर) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
स्वीटी योगेश संघवी (38, रा.उत्राण, ता. एरंडोल, ह.मु. संघवी कॉलनी, पाचोरा) यांच्या बँक खात्यातून रक्कम वळती करण्यात आली होती व याप्रकरणी पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपनिरीक्षक कैलास ठाकूर यांच्या मदतीने आरोपी विशाल दीपक गायकवाड यास नागपूर येथून अटक करण्यात आली.

फिर्यादी स्वीटी संघवी यांचा एच.डी.एफ.सी. बँकेचा खाते क्रमांकाशी त्यांचा मोबाईल नंबर 7888213238 लिंक होता. हा मोबाईल नंबर नंतर मोबाईल कंपनीने आरोपी विशाल दीपक गायकवाड (25, रा.फ्लॅट नंबर 702, सातवा मजला, अमर पॅलेस, धंतोली, नागपूर) याला दिला होता. फिर्यादीचे बँकेचे चेक बुक व एटीएम कार्ड कुरिअर कंपनीकडून डिलीव्हरीसाठी आले असताना कुरिअर कंपनीने या नंबरवर फोन केला.

आरोपी विशाल गायकवाड याने खोटे बोलून हे पार्सल नागपूर येथील त्याच्या घराच्या पत्त्यावर मागवले. पार्सल स्वीकारल्यानंतर आरोपीने त्यातील एटीएम कार्डचा पिन सेट केला. त्यानंतर 21 मार्च 2023 ते 24 मार्च 2023 या कालावधीत वेगवेगळ्या ठिकाणाहून फिर्यादीच्या बँक खात्यातून अवैधरित्या एकूण तीन लाख 19 हजार 516 रुपये काढले. या प्रकरणी 2023 मध्ये गुन्हा दाखल होता.