मुक्ताईनगर (प्रतिनिधी) :- सालबर्डी फाट्याजवळ शनिवारी पहाटेच्या सुमारास ट्रकचा भीषण अपघात झाला. झोपेच्या डुलकीमुळे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रक पुलाच्या कठड्याला धडक देत पुलावरून खाली पडला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
अंकित कल्लू मेहंदोले (वय २४, रा. राजना, मध्य प्रदेश) असे ट्रक चालकाचे नाव असून, त्याने चालवित असलेला ट्रक (क्र. एम.एच. ४० सी.एम. ५३१४) हा लोखंडी पोलचा माल घेऊन जात होता. २५ ऑक्टोबर रोजी पहाटे सुमारास सालबर्डी फाट्याजवळ चालकाला झोपेची डुलकी लागल्याने वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे ट्रक महामार्गाच्या मध्यभागी असलेल्या कठड्याला देत खाली पडला.
अपघातानंतर चालक किरकोळ जखमी झाला असून त्याला मुक्का मार लागल्याचे सांगण्यात येते. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन जखमी चालकाला मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. २५ ऑक्टोबर रोजी उशिरापर्यंत मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झालेली नव्हती.



