गुरे चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींची पोलिसांच्या हातावर तुरी : जळगाव जिल्ह्यात खळबळ –

अमळनेर (प्रतिनिधी) : गुरे चोरीच्या गुन्ह्यातील दोन संशयीत पोलिसांच्या तावडीतून पसार झाल्याची घटना अमळनेर तालुक्यात घडल्याने जिल्हा पोलिस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे. शाकीर शाह अरमान शाह आणि अमजद शेख फकीर कुरेशी अशी पसार झालेल्यांची नावे आहेत. संशयीतांना जळगाव गुन्हे शाखेचे पथक तपासार्थ अमळनेरकडे नेत असताना आरोपींनी पोलिस वाहनातून उडी टाकून बेड्यांसह पळ काढला.


शाकीर शाह अरमान शाह आणि अमजद शेख फकीर कुरेशी यांना गुरे चोरीच्या प्रकरणात अटक करण्यात आली. संशयीतांना स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी शासकीय वाहनातून अमळनेर येथे नेत असताना कुर्‍हे रेल्वे अंडरपास बोगद्यात वाहन आल्यानंतर मागच्या सीटवर बसलेले हे दोघे आरोपी खाली उतरून पळून गेले.

पोलिसांच्या तावडीतून पसार झालेल्या या दोघा आरोपींच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 262 प्रमाणे अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पसार आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.