दारुड्या मुलाने बापावर विळ्याने वार करून केले गंभीर जखमी ;मुलगा फरार


धरणगाव ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील चांदसर येथे कौटुंबिक वादातून दारूच्या नशेत असलेल्या मुलाने जन्मदात्या वडिलांवर लोखंडी विळ्याने वार करून त्यांना पोटात गंभीर दुखापत केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी, ५ ऑगस्ट रोजी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास समोर आली आहे. या घटनेनंतर मारेकरी मुलगा फरार झाला असून, जखमी झालेल्या वडिलांना जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

चांदसर येथे छगन यादव कोळी (वय ६०) हे मुलगा समाधान छगन कोळी आणि कुटुंबासह राहतात. मुलगा समाधान कोळी याच्यामुळे घरात नेहमी कौटुंबिक कारणांवरून वाद होत असे. मंगळवारी रात्री १०.३० वाजता समाधान कोळी दारू पिऊन घरी आला. त्यावेळी त्याचे वडील छगन कोळी यांच्याशी पुन्हा वाद सुरू झाला. या वादाचे रूपांतर भांडणात झाले आणि संतापाच्या भरात मुलगा समाधान कोळी याने वडील छगन कोळी यांच्या पोटावर लोखंडी विळ्याने वार केले, यात ते गंभीर जखमी झाले.

ही घटना घडल्यानंतर लगेचच समाधान गावातून फरार झाला. जखमी छगन कोळी यांना तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेबाबत अद्याप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. पोलीस पुढील तपास करत आहे