जिल्हा वकील संघाच्या अध्यक्षपदी ॲड. सागर चित्रे,; उपाध्यक्षपदी स्मिता झाल्टे तर सचिवपदी विरेंद्र पाटील ;

जळगाव : जिल्हा वकील संघाच्या निवडणुकीमध्ये अध्यक्षपदी ॲड. सागर चित्रे यांनी 101 मतांनी विजयी होत बाजी मारली. सचिवपदी ॲड. विरेंद्र पाटील व उपाध्यक्षपदी ॲड. स्मिता झाल्टे हे सहज विजयी झाले. त्यांचे समर्थक ॲड. जितेंद्र बच्छाव होते. विजयानंतर विजयी उमेदवार व समर्थकांनी मोठा जल्लोष केला.
जिल्हा वकील संघाच्या 15 पदांसाठी झालेल्या निवडणुकीसाठी दि. 8 ऑगस्ट रोजी सकाळी आठ ते दुपारी चार या वेळेत मतदान झाले. यामध्ये एकूण एक हजार 79 मतदारांपैकी 749 जणांनी (69.32 टक्के) मतदान केले. त्यानंतर सुरु झालेल्या मतमोजणीत अध्यक्ष पदासाठी ॲड. सागर चित्रे विजयी उमेदवार ठरले. जिल्हा वकील संघाच्या निवडणुकीसाठी सकाळी 8 वाजेपासून मतदानास सुरुवात झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ॲड. गणेश वाघमारे यांनी काम पाहिले. अध्यक्षपदी ॲड. सागर चित्रे यांनी 424 मते मिळवली. प्रतिस्पर्धी उमेदवार ॲड. संजय राणे यांना 353 मते मिळाली. उपाध्यक्षपदी ॲड. स्मिता झाल्टे यांनी 379 मते मिळवली. त्यांचा विजय देखील सहज झाला. सचिवपदी ॲड. विरेंद्र पाटील यांनी 394 मते मिळवून विजय संपादन केला. सहसचिवपदी ॲड. लीना म्हस्के, कोषाध्यक्षपदी ॲड. प्रवीण चित्ते हे विजयी झाले. सदस्यपदासाठी ॲड. वर्षा पाटील व ॲड. अजयकुमार जोशी यांचे अर्ज छाननीवेळी नामंजूर करण्यात आले. यातील ॲड. वर्षा पाटील यांनी अर्ज नामंजुरीविरोधात अपील दाखल केले होते. मात्र तेही फेटाळण्यात आले. त्यामुळे महिला सदस्य म्हणून ॲड. शारदा सोनवणे, ॲड. कल्पना शिंदे विजयी झाल्या. निकाल घोषित झाल्यानंतर विजयी उमेदवारांनी मोठा जल्लोष केला. ढोल-ताशाच्या गजरात गुलाल उधळून जल्लोष करण्यात आला.