कल्याणमध्ये अंमली पदार्थ विक्रीवर पोलिसांचा धडाकेबाज कारवाईचा सपाटा–२२ लाखाच्या मेफेड्रॉन’ व ‘गांजा’सह तीनजण अटकेत

कल्याण (प्रतिनिधी):
परिमंडळ ३, कल्याण येथील विशेष पोलीस पथक आणि खडकपाडा पोलीस ठाण्याच्या संयुक्त कारवाईत दोन वेगवेगळ्या प्रकरणांत मेफेड्रॉन (एम.डी.) व गांजासारख्या अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या तिघा आरोपींना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई १७ व १८ जुलै २०२५ रोजी करण्यात आली.
प्रकरण १: मेफेड्रॉनसह दोन आरोपी गजाआड

दिनांक १८ जुलै २०२५, सायंकाळी ४:४५ वाजता, फोर्टीस हॉस्पिटलसमोर, एपीएमसी मार्केटच्या मागील रस्त्यावर गस्त घालत असलेल्या विशेष पथकाला दोन संशयित व्यक्ती निदर्शनास आल्या. त्यांच्याकडे ११० ग्रॅम मेफेड्रॉन (एम.डी.) सापडला, ज्याची बाजारमूल्य ₹२२ लाख इतकी आहे.

अटक आरोपी:

  1. मोहम्मद कैफ मन्सुर शेख (वय २४), रा. बैलबाजार, कल्याण (प.)
  2. फरदीन आसीफ शेख (वय २४), रा. कोनगाव, भिवंडी

या प्रकरणी गु.र.नं. ४३७/२०२५ अन्वये एन.डी.पी.एस. कायदा कलम ८(क), २२(क), २९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास बाजारपेठ पोलीस ठाणे करत आहे.

प्रकरण २: गांजासह एकजण अटकेत

दिनांक १७ जुलै २०२५, संध्याकाळी ५:४५ वाजता, योगीधाम-अमृतधाम रस्त्यावर, साई दर्शन ढाब्याजवळ, वालधुनी नदीकाठी संशयास्पद हालचाली आढळून आल्या. पोलिसांनी केलेल्या कारवाईत ११२० ग्रॅम गांजा सापडला, ज्याची किंमत सुमारे ₹२५,०००/- आहे.

अटक आरोपी:

रवि शिवाजी गवळी (वय ३०), रा. अनुपमनगर, खडकपाडा, कल्याण (प.)

या प्रकरणी गु.र.नं. ५९८/२०२५ नोंदवून एन.डी.पी.एस. कायदा कलम ८(क), २०(ब), गा(ब) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास खडकपाडा पोलीस करीत आहेत.

पोलीसांचा इशारा: कठोर कारवाया सुरूच राहणार

परिमंडळ ३ चे पोलीस उपायुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थांच्या विक्रीविरोधात अशी कठोर व सातत्यपूर्ण कारवाई सुरुच राहील, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. युवकांचे भवितव्य घडवण्यासाठी आणि समाजात आरोग्यदायी वातावरण निर्माण करण्यासाठी अशा प्रकारच्या मोहिमा अधिक तीव्र करण्यात येणार आहेत.

अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांना कायद्याच्या कचाट्यात अडकवण्याचा पोलिसांचा निर्धार निश्चितच कौतुकास्पद आहे.