भुसावळ (प्रतिनिधी ) – विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालय, भुसावळ येथे “मिशन सहयोग” या विशेष कार्यक्रमाचे आज दिनांक 26 जून 2025 रोजी आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम अनुकंपाधारित नियुक्त कर्मचारी, विशेषतः महिला कर्मचाऱ्यांच्या सक्षमीकरण व मार्गदर्शनासाठी आयोजित करण्यात आला होता.

या प्रसंगी विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्रीमती इति पाण्डेय यांनी अनुकंपाधारित नियुक्त कर्मचाऱ्यांशी थेट संवाद साधला. त्यांनी विशेषतः अशा महिला कर्मचाऱ्यांशी चर्चा केली ज्या लहान मुलांच्या जबाबदाऱ्यांसह रेल्वेतील सेवेत कार्यरत आहेत. श्रीमती इति पाण्डेय यांनी काम आणि कौटुंबिक आयुष्य यामध्ये समतोल राखण्यासाठी व्यावहारिक उपाय सांगितले.
तसेच, कर्मचाऱ्यांना आवश्यक प्रशिक्षण मिळाले आहे का, व त्याचा त्यांना किती फायदा झाला आहे याचा आढावा घेण्यात आला. कार्यक्रमात त्यांनी कर्मचारी, पर्यवेक्षक व वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये समन्वयाचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यस्थळी सुरक्षा, वेळेचं पालन व जबाबदारीपूर्ण वर्तन यासंदर्भात मार्गदर्शनही दिले.
या कार्यक्रमात अपर विभागीय रेल्वे व्यवस्थापक (प्रशासन) श्री सुनील कुमार सुमन, अपर विभागीय रेल्वे व्यवस्थापक (तांत्रिक) श्री मुकेश कुमार मीना तसेच इतर वरिष्ठ शाखाधिकारी उपस्थित होते. त्यांनी कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवून उपयुक्त सूचना दिल्या.
कार्यक्रमाच्या समाप्तीनंतर अनुकंपाधारित नियुक्त कर्मचाऱ्यांनी त्यांच्या नियुक्ती प्रक्रियेची पारदर्शकता आणि सहजतेबद्दल तसेच मिळालेल्या मार्गदर्शनासाठी मंडल रेल्वे व्यवस्थापक आणि प्रशासनाचे मनःपूर्वक आभार मानले.



