पाचोरा येथील शिक्षकाची शाळेच्या वर्गातच गळफास घेऊन आत्महत्या

पाचोरा – एका शाळेत शिक्षणाने दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना जळगाव जिल्ह्यातील पाचोरा शहरातील शाळेत २५ जून रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास उघडकीस आली.

अधिक वृत्त असे कि, पाचोरा तालुक्यातील दहिगाव संत येथील रविंद्र महाले हे सध्या पाचोरा शहरात ते वास्तव्यात होते आणि पाचोरा शहरातील एका शाळेत ते शिक्षक म्हणून कार्यरत होते. दरम्यान, आज २५ रोजी सकाळी दहा वाजेच्या वाजेच्या सुमारास रविंद्र महाले यांनी शाळेतील तिसऱ्या मजल्यावरील एका वर्ग खोलीत टोकाचे पाऊल उचलत दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला .

घटनेची माहिती समजताच शाळेतील कर्मचाऱ्यांनी तात्काळ पोलीस प्रशासनाला माहिती दिली. यानंतर घटनेची माहिती मिळताच पाचोरा पोलीस ठाण्याचे निरीक्षक अशोक पवार, सहायक निरीक्षक श्री. निकुंभ, उपनिरीक्षक श्री. घायाळ तसेच पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. जय मल्हार चालक बबलू मराठे, किशोर लोहार आणि अमोल पाटील यांच्या मदतीने मृतदेह गळफासाच्या अवस्थेतून खाली उतरविण्यात आला. सदर घटनेचा पंचनामा केला.

दरम्यान, आत्महत्येचं नेमकं कारण स्पष्ट झालेलं नसून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाचोरा ग्रामीण रूग्णालयात पाठवण्यात आला आहे. याप्रकरणी पाचोरा पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत. दरम्यान मृदुभाषी शिक्षकाने हे टोकाचे पाऊल का उचलले याचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे . शिक्षकाने शाळेत आत्महत्या केल्याच्या या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे . विद्यार्थ्यी तसेच सहकारी शिक्षकांमध्ये शोककळा पसरली आहे.